Breaking News

छिंदमचे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरोधात संबध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, अहमदनगर येथे रविवारी छिंदम याचे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. गेल्या दोन दिवसापासून अनेक ठिकाणी त्याचा निषेध करण्यात येत असून दोन दिवसापूर्वी शिवप्रेमींनी त्याच्या कार्यालय फोडले, घराजवळील लावलेल्या गाड्याही तोडण्यात आल्या. त्याच्या घरावर दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या. छिंदमला अटक झाल्यानंतर हे वातावरण शांत होईल असे वाटत असतानाच रविवारी दुपारी 4 च्या दरम्यान काही शिवप्रेमींनी येवुन त्याच्या दिल्लीगेट येथील कार्यालयाला पेटवुन देण्याचा प्रयत्न केला. छिंदमला अटक झाली असून त्याला न्यायालयाने 1 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी कोठडी करण्यात आली असून अजूनही शिवप्रेमींचा रोष कमी झालेला नसल्याचे चित्र आहे. दिल्लीगेट परिसरातील त्याचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला असल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली आणि येथे येणार्‍यांची संख्या काही मिनीटात वाढली. या घटनेमुळे काही काळ दिल्लीगेट परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी ती सुरळीत केली.
दरम्यान, नागरिकांच्या भावना तीव्र होत चालल्या असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त शहरात तणावाचे वातावरण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे वेळीच दक्षता घेत, शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, महामानवांच्या पुतळयांना देखील संरक्षण देण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्तासाठी अतिरिक्त तुक डयाची कुमक मागवण्यात आली आहे.