Breaking News

पेठ तालुक्यातील मजुरी अपहार दडपण्यासाठी कंत्राटदारांचा बळी


नाशिक /प्रतिनिधी :- जिल्हा प्रशासन कृषी महोत्सवाच्या तयारीत व्यस्त असल्याने पेठ तालुक्यातील कृषी खात्यातील अनागोंदीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान या पापाला पेठ तालुका कृषी खाते जबाबदार असतांना खापर मात्र कंत्राटदारांच्या माथ्यावर फोडण्याचे कर्तव्य जिल्हा कृषी प्रशासन प्रामाणिकपणे पार पाडीत आहे.
पेठ तालुक्यातील मजूर गेल्या सहा सात वर्षापासून आपल्या कष्टाचा मोबदला मिळावा म्हणून तालुका कृषी खात्याशी संघर्ष करीत आहेत. पाणलोट योजनेत या मजुरांना कामावर घेण्यात आल्यानंतर त्यांची रितसर मजूरी मात्र दिली गेली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शारिरिक कष्टाचे दाम देतांना नाना क्लूप्त्या लढवून मजूरीच्या रकमेत अपहार करणार्‍या तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचार्‍यांनी ट्रॅक्टर धारकांचाही मेहेनताना अदा करताना फाळके मारल्याचा आरोप होत आहे. यापैकी अनेक मजूर अशिक्षित असल्याने किती रक्कम लिहीली गेली आणि प्रत्यक्षात हातात किती मिळाले याचा हिशेब लक्षात नाही त्याचा फायदा या मंडळींनी लाटल्याची तक्रार आहे. 

दरम्यान या प्रकरणाशी संबंधित तालुका कृषी अधिकारी अन्य ठिकाणी बदलून गेल्याने पेठ तालुक्यात कार्यरत असलेले त्यांचे तत्कालीन सहकारी हे प्रकरण दाबण्याचा कुटील प्रयत्न करीत असून पेठमधील वजनदार मंडळीची मध्यस्थी करू पहात आहे. आश्‍चर्य म्हणजे जिल्हा कृषी अधिकारी किंबहूना संबंधित प्रकल्प अधिकार्‍यांना हे सर्व प्रकरण माहीत असूनही मजूरांना न्याय देण्याची मानसिकता मृत झाल्याचे संकेत त्यांच्या देहबोलीतून मिळत आहेत. सध्या जिल्हा प्रशासन कृषी महोत्सवाच्या तयारीत व्यस्त असल्याने या मजुरांची मजूरीबाबत विचार करण्यास वेळ नाही. उलट हे प्रकरण वेगळ्या दिशेने नेण्याच्या उद्देशाने मजुरीचे पातक कंत्राटदारांच्या माथी मारण्याचे प्रयत्न जिल्हा कृषी खात्याकडून केले जात आहेत.