Breaking News

हरहर महादेवच्या गजराने त्रिवेणीश्वर दुमदुमले


नेवासा/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव-सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे सहा दिवशीय महाशिवरात्री सोहळ्यास धर्म ध्वजारोहणाने शुक्रवार दि ९ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला. हर- हर महादेवच्या गजराने झालेल्या धर्मध्वजारोहन कार्यक्रमाने त्रिवेणीश्वरचा परिसर दुमदुमला होता. देव व संत हे भूतलावरील एकच रूप असून देव व संत असा भेद करू नका. असे आवाहन महंत भूपेंद्रगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले

श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व ब्रम्हलीन भक्त योगीराज प्रल्हादगिरी महाराज व सद्गुरू स्वामी प्रकाशगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेल्या महाशिवरात्री सोहळ्या निमित्त शुक्रवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरेशनगरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून शोभा यात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये पंजाब येथील ऋषिकेश आश्रमाचे महंत भूपेंद्रगिजी महाराज,राष्ट्रीय कीर्तनकार हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे, महंत रामगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, महंत गोपालानंदगिरी महाराज, डॉ.हभप जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार शंकरराव गडाख यावेळी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

या शोभायात्रेमध्ये अग्रभागी डोक्यावर कलश घेतलेल्या बालिका, त्रिमूर्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांचे बँडपथक, उस्थळदुमाला येथील किसनगिरी बाबा विद्यालयाचे झांजपथक, लेझीम पथक सहभागी झाले होते. तोफांच्या सलामीने व फटाक्यांच्या आतषबाजीने शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीचा समारोप त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणात झाल्यानंतर धर्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य आचार्य प्रकाशगुरू मुळे यांनी केले.