Breaking News

संशोधन व कष्ट यांची योग्य सांगड घालण्याची गरज: डॉ.ढगे


भेंडा/ प्रतिनिधी /- परंपरागत शेतीची वाटचाल उच्च तंत्रज्ञानाच्या शेतीकडे होत असताना अधिक उत्पादन वाढीसाठी शास्रज्ञानी विकसित केलेले संशोधन व शेतकऱयांचे कष्ट यांची योग्य सांगड घालण्याची गरज असल्याचे वक्तव्य सुलोचना बेल्हेकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे यांनी केले.
भेंडा येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता कृषी तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांना कार्यानुभव प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ढगे बोलत होते. जिजामाता तंत्रनिकेतनचे प्राचार्य सोपानराव मते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा जलसाक्षरता समितीचे जलनायक सुखदेव फुलारी,पत्रकार नामदेव शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. ढगे पुढे म्हणाले की ,पुरातन काळापासूनच शेतीला महत्व आहे. सर्वप्रथम गौतम ऋषींनी ब्रम्हगिरी पर्वतावर शेती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनीही शेतीला प्रोत्साहन दिले, शेतीमालाचे रक्षण केले. आजच्या काळात ही शेतीला महत्व व भवितव्य आहे परंतु त्यासाठी आपल्याला कृषी कौशल्य निर्माण करावे लागेल. पूर्वीच्या पारंपरागत शेतीची वाटचाल आधुनिक शेती कडून उच्च तंत्रज्ञाच्या शेतीकडे सुरू आहे. लोकसंख्येच्या प्रमाणत शेतीचे क्षेत्र कमी कमी होत असल्याने कौशल्य निर्माण करून कमी जागेत अधिक उत्पादन घेणे ही काळाची गरज आहे. जमीन,पाणी, बी-बियाणे, खते व किडनियंत्रण या पंचसूत्रीचे नियोजन महत्वाचे आहे. जमिनीचे आरोग्य बिघडलेले असल्याचे माती परीक्षण केले पाहिजे. अधिक पाणी दिले तर अधिक उत्पन्न मिळते हा समज चूकीचा आहे. संतुलित खते व संतुलित पाणी द्यावीत.एकात्मिक पीक व्यवस्थापन व जैविक खतांचा वापर ही काळाची गरज आहे.

जलनायक सुखदेव फुलारी म्हणाले,पाणी आणि माती हेच सर्वांच्या उत्पत्तीचे साधन आहे. पाणी, माती यांची काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याकडे उपलब्ध पाण्याचे वॉटर ऑडिट करून किती पाणी उपलब्ध होऊ शकते यावरच क्रॉप पॅटर्न ठरविला पाहिजे. शेतकरी हाच खरा शास्रज्ञ आहे. तो शेतात रोजच नवनवीन प्रयोग करत असतो. त्याला फक्त शाश्वत पाण्याची आवश्यकता असते. कमी पाण्याचा वापर करून अधिक उत्पादन वाढविण्यासाठी कृषी पदवीधरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

प्राचार्य सोपानराव मते यांनीही मनोगत व्यक्त केले. एस.व्ही.वाबळे, अभिजित भणगे, ए.टी. मासाळ, एस.बी.खाटीक, टी.एस.भांड, नंदकिशोर देशमुख यांचेसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. दिपक नजन यांनी सूत्र संचालन करून आभार मानले.