Breaking News

क्रीडा स्पर्धेमुळे सांघीक भावना वाढून अधिकारी-कर्मचारी जोमाने काम करतील : ना. जानकर

सातारा :- सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. या जिल्ह्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केले आहेत. या जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन चांगल्या पध्दतीचे काम केले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. तसेच विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यामधील सांघीक भावना वाढून ते अधिक जोमाने काम करतील, असा विश्‍वास पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.


येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रामाचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर बोलत होते. प्रारंभी सर्व खेळाडूंनी संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पालक मंत्री विजय शिवतारे यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, आर. बी. घोटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, विलास राजपूत, प्रकल्प समन्वयक सचिव आर. व्ही. पानसे, व्यवस्थापकीय संचालक ए. एम. खापरे, संकल्पचित्र विभागाचे महासंचालक राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता विजय घोगरे यावेळी उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धांना अन्नन्य साधारण महत्व आहे. जलसंपदा विभागाने या स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अधिकारी व क र्मचार्‍यांची आरोग्य सांभाळण्यास मदत होवून सांघीक भावना वाढीस मदत होईल. यातून तुमच्या हातून महाराष्ट्रात जलसंधारणाची चांगली कामे नक्की होतील, असा विश्‍वास व्यक्त करुन पशुसंवर्धन मंत्री जानकर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, अधिकारी, कर्मचार्‍यांचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 2015 परिपत्रक काढून प्रत्येक विभागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अन्य विभागांबरोबरच आता जलसंपदा विभागातही क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मागील वर्षी औरंगाबाद येथे स्पर्धा झाल्या. या वर्षी दुसर्‍या स्पर्धेचे यजमान पद सातारा जिल्ह्याला मिळाले आहे. अशा स्पर्धांमुळे सांघीक भावना, कार्यक्षमता व आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जलसंपदा विभाग हा शासनाचा महत्वाचा विभाग असून राज्य निर्मितीचे काम करते. पाणी म्हणजे जीवन आहे. जलसंपदा विभाग प्रत्येक घटकांपर्यंत पाणी पोहचवून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत करतो. हा अतिशय महत्वाचा विभाग असून जबाबदारीने काम करुन सर्वांना न्याय देण्याचे काम करतो.


या होणार्‍या तीन दिवसीय स्पर्धेचा आनंद घ्या. या स्पर्धेमुळे तुमच्यातील सांघिक भावना, चांगले आरोग्य, काम करण्याची क्षमता नक्कीच वाढून जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे मनसंधारण करण्याचे कामही क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून होईल, असा विश्‍वास व्यक्त करुन सर्व खेळाडूंना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शुभेच्छा दिल्या.जानेवारी महिन्यात बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे झालेल्या पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये अधिकारी, कर्मचारी असे एकूण 170 खेळाडूंनी भाग घेतला होता. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने उपविजेतेपद संपादन केल्याबद्दल पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हधिकारी श्‍वेता सिंघल व त्यांच्या टीमचे करंडक व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उप स्थित होते.