विक्रमगडमध्ये ‘एक गाव एक होळी’ची परंपरा आबाधित
विक्रमगड, जव्हार व मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये या सणावराची शोभा द्विगुणीत होते ती आदिवासींकडे असलेल्या विविध कला व पारंपारीक नृत्यकलेमुळे. त्यामध्ये तारपा, टपरी नाच, ढोलनाच ही नृत्य साजर करुन सर्व गाव असो वा पाडा असा एकत्र येऊन सामुहिकरित्या होळीचा आनंद लुटला जातो. पहिले तीन दिवस छोटया होळया, चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच ०१ मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो़. या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्याचा (डफली) आवाज आजही शिमग्याला पारंपारिक ग्वाही देत आहे़ चोरटी होळीसाठी तरुण गावातुनच लाकडे चोरुन आणतात़
तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणजे विक्रमगड शहर. तसे गावागावात आठवडाबाजार भरतात परंतु सणाकरीता विक्रमगड शहरातून खरेदी करण्याची परंपरा आहे़ त्यानुसार होळीसाठी सध्यस्थितीत विक्रमगड बाजार फुललेला असून आजु बाजुच्या खेडयावरील आदिवासी लोक बाजाराप्रमाणे चार दिवस गर्दी करीतात. यावेळी पोसत मागण्याकरीता पुरुष महिलेचे कपडे घालून गमती करतात. कुणी तोंडाला, अंगाला रंग लावुन वेगळा पेहराव करुन अगर फुटलेला पत्राचा डबा वाजवत, मुखवटा लावुन घराघरातुन दुकानदारांकडून पोसत (पैसे) मागतात. होळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी) अगर बांबुच्या फांदया होळी माता म्हणून पुजा केली जाते. पुजेला तांदळाच्या नागलीच्या व कुरडई च्या पापडया, पुरणपोळी तसेच घरी बनवलेल्या वस्तुंचे नैवैद्य दाखविले जाते़ बांबु किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेडयावर अगर रितीप्रमाणे जिवंत कोंबडीचे पिल्लु बांधले जाते. ही प्रथा आजही आबाधित आहे. त्याचप्रमाणे नव विवाहीत जोडपी आपल्या पत्नीला खांदयावर घेवून होळीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा असून ती आजही मोठ्या हौसेमौजेने पार पाडली जाते़
