Breaking News

दुर्गंधीसह अस्वच्छतेने सिध्दटेकला भाविक त्रस्त मंदीरासमोर कचर्‍याचे ढीग ; देवस्थान प्रशासन गाफील

अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेकला कचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे अस्वच्छता व दुर्गंधीने ग्रासले आहे. चिंचवड देवस्थान तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या विविध भागातून येणार्‍या भाविकांना नाकाला रुमाल लावूनच मंदिराच्या दिशेने जाण्याची वेळ येत असताना प्रशासनाकडून मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.


धार्मिक ठिकाणाहून धार्मिक भावनेसोबतच इतर सामाजिक संदेशही समाजात जात असतात. स्वच्छतेच्या ठिकाणी देव नांदत असल्याचा महत्वपूर्ण विचार आहे. मात्र आता देवालयच अस्वच्छतेचे माहेरघर बनत चालले आहे. सिध्दटेकला दररोज हजारो तर चतुर्थीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र येथे व्यवस्थापनाच्या अभावामुळे भाविकांची अवहेलना होत आहे. मंदिरासमोरच्या जागेत रसवंती गृहातून बाहेर पडलेला कचरा, नारळाच्या शेंड्या, प्लॅस्टिक कचरा यांचे ढीग पडलेले आहेत. रसवंती गृहातून बाहेर पडलेल्या गोड व ओलसर कचर्‍यावर माशा घोंगावत आहेत. येथील कचरा सडल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटलेली आहे. भाविक वाहनांतून खाली उतरून प्रवेशद्वाराकडे जातानाच दुर्गंधी जाणवते. ग्रामपंचायतीने सिमेंटच्या कुंड्या मांडलेल्या असुनही त्याचा वापर व्यावसायिकांकडून होत नाही. मंदीर परिसरात अतिक्रमण करुन व्यवसाय थाटले असून प्रशासन नियमांचे उल्लंघन करीत व्यावसायिकांचीच मुजोरी येथे दिसून येते. आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केल्यास मंदिर परिसर घाणीच्या साम्राज्यातुन मुक्त होवू शकेल. प्रांताधिकारी अध्यक्षा असलेल्या विकास समितीने याबाबत पुढाकार घेतल्यास सिध्दटेकच्या विकासाचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लागू शकेल.


विकास समितीकडून कर्मचारी नियुक्त नाहीत...
स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी नेमलेला आहे. मंदीरासमोर सिमेंट कचराकुंड्या ठेवण्यात आल्या, मात्र व्यावसायिक त्याचा वापर करणे टाळतात. मंदिराच्या पायर्‍यांपासुन बाहेरील वडाच्या झाडापर्यंतचा परिसर व गाव स्वच्छता काम जास्त असल्याने स्वच्छतेबाबत अडचणी येत आहेत. नियोजन व विकास समितीकडून चार कर्मचारी नेमण्यात यावेत असा ठराव नियोजन समितीच्या बैठकीत घेतला असला तरिही त्यावर कर्मचारी नियुक्तीची कार्यवाही अद्याप झालेली नाही.
विनियता पवार,
ग्रामसेविका, सिध्दटेक


देवगडचा आदर्श घ्यावा...
सिध्दटेकला देवगडप्रमाणेच अतिशय विलोभनीय निसर्गसौंदर्य आहे. येथील स्वच्छता राज्यात आदर्श घालून देणारी आहे. देवगडला वळसा घालून जाणारी प्रवरानदी आहे, तसेच सिद्धटेकला भीमा नदी आहे. मात्र येथे भाविकांना सुविधा मिळत नाहीत.स्वच्छतेबाबत उदासीनता दिसत आहे. देवगडचा आदर्श घेवून व्यवस्था केल्यास भाविकांमध्ये स्वच्छतेचा संदेश जाईल.
धर्मानाथ पाटील,
भाविक, सिध्दटेक