Breaking News

मुंबईत जागतिक दर्जाचे डीजीटल मीडिया कंटेट हब बनण्याची क्षमता

मुंबई, दि. 21, फेब्रुवारी - महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रात आणि माहितीच्या क्षेत्रात देशातील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यात कायम यशस्वी आहे मात्र जागतिक स्तरावर आवश्यक दर्जा आणि कंटेट तयार करण्याची क्षमता राज्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितलेल्या ट्रिलीयन डॉलर इकानामी स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मनोरंजन क्षेत्राचा मोलाचा वाटा असेल असे मत माहिती आणि मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञानी व्यक्त केले.


’मॅग्नेटिक महाराष्ट्र कान्व्हर्जन्स 2018’ या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित माहिती आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्य निर्मितीसंदर्भात चर्चासत्रात ही मतं मांडली गेली. प रिषदेच्या शेवटच्या दिवशी रंगलेल्या या परिसंवादाला सुप्रसिद्ध सिनेकलावंत शाहरुख खान, रिपब्लिक या वृत्तवाहिनीचे अर्नब गोस्वामी, एक्सेल कम्युनिकेशनचे रितेश सिंघानीया, वाय कॉम मीडियाचे शुधांशू, मॅझान या डीजीटल वाहिनीचे विजय सुब्रमन्यम आणि लोकमत वृत्तसमुहाचे ऋशी दर्डा सूत्र संचालक विक्रम ओझा यांनी सहभाग घेतला होता.
मनोरंजन क्षेत्रात आता अमुलाग्र बदल हो असून बदलत्या मागणीनुसार निर्मात्यांनी चित्रपट निर्मिती केली पाहिजे असे मत शाहरूख खान यांनी व्यक्त केले. लोकांना आपल्या सोयी नुसार मनोरंजन हवे आहे, सिने निर्मितीचे नवे आयाम समोर येत आहेत. जागतिक दर्जाची चित्रपट निर्मिती होण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. कंटेट निर्मिती ही आता कोणा एकाची मक्तेदारी राहिलेली नसून सर्व स्तरावर कंटेट तयार होत आहेत मुंबईत जागतिक दर्जाचे डीजीटल मीडिया कंटेट हब बनण्याची क्षमता आहे लक्षात घेऊन येथे ग्राहकाभिमुख डीजीटल हब तयार करण्यात यावा अशी सूचनाही दिली.
क्रिएटीव क्षेत्रातील लोकांनी एकत्रीत येऊन निर्भयपणे काम करण्याची गरज असल्याचे मत अर्नब गोस्वामी यांनी व्यक्त केले. जागतिक स्तरावरील बातमीदारी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. मोबाईल धारकांची संख्या आणि इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या वाढत असल्याने त्या वर्गाचा विचार लक्षात घेऊन माहिती तयार होण्याच्या आवश्यक तेवरही त्यांनी भर दिला.
वाय कॉम मीडियाचे शुधांशू यांनी प्रादेशिक भाषेतील मनोरंजनाकडे वळण्याची गरज आहे असे सांगितले. सुमारे 300 मिलीयन प्रेक्षक डिजीटल माध्यमांचा उपयोग करत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एक्सेल कम्युनिकेशनचे रितेश सिंघानीया यांनी चित्रपट निर्मितीसाठी लागणार्‍या सर्व परवानग्या एकत्रित मिळाव्यात अशी मागणी केली. बाहेरील देशातील निर्मात्यांनाही देशात चित्रपट निर्मितीसाठी अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकताही त्यांनी नमूद केली. लोकमत समुहाचे ऋषी दर्डा यांनी बदलत्या काळाबरोबर वृत्तपत्रे, चित्रपट, वृत्त वाहिन्या या पारंपरिक माध्यमांनी नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करणे गरजेचे आहे असे सांगितले.