शेवगाव /प्रतिनिधी : शेवगाव शिवारातील हातगाव येथील दोन वस्त्यावर शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकत धुमाकूल घातला. या दरोडयात सुमारे 72 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला. यावेळी दरोडेखोरांनी दोन्ही वस्त्यांवरींल रहिवाश्यांना लोखंडी, कुर्हाड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. हे सर्व जखमी शेवगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हातगाव शिवारातील देविदास साहेबराव गादे यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला चढविला. यावेळी कुटूंबियांनी आमचे सगळे काही घ्या पण आम्हाला मारहाण करु नका अशी विनंती गादे कुटुंबीय करीत असताना त्यांनी मारहाण चालुच ठेवली. या वस्तीवरील देविदास साहेबराव गादे (वय 40) त्यांच्या घरी पाहुणी म्हणुन आलेल्या त्यांची विहीण सिंधुबाई कुंडलीक चेडे (वय 55), पत्नी गयाबाई देविदास गादे, वडील साहेबराव गादे यांना मारहाण केली. यात देविदास गादे यांचा हात मोडला असुन जिवन दत्तात्रय गादे या मुलासही मारहाण केली. यावेळी या वस्तीवरुन 48 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरटयांनी लांबवला. गादे वस्तीजवळ असणार्या बर्गे वस्तीवरही चोरटयांनी आपला मोर्चा वळवून दत्तात्रय बापुसाहेब बर्गे (वय 49), मंदा दत्तात्रय बर्गे (वय 45) यांच्यावर देखील हल्ला करून, दोघांनाही जबर जखमी केले. त्यांच्या वस्तीवरुन सुमारे 24 हजार रुपयांचे दागिने, मणी मंगळसुत्र इत्यादी वस्तु लांबविल्या. हे दाम्पत्य शेवगाव येथील रुग्णालयात दाखल आहेत. गुन्हा घडल्यानंतर वस्तीवरील जखमींना घेवून जाण्यासाठी, उपस्थित नागरिकांनी 108 नंबरच्या रुग्णवाहिकेस दुरध्वनी केला असता रुग्ण्वाहिका आलीच नाही. यावेळी जखमींना खासगी वाहनांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरील घटना स्थळी श्वानपथक आले होते. या गुन्हयाचा तपास शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे करीत आहेत. तसेच गुन्हा घडलेल्या घटना स्थळास जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय पोलीस अधिक्षक पोर्णिमा तावरे, शेवगाव पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे घटना स्थळास भेट दिली. या घटनेने हातगाव, बोधेगाव, मुंगी परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
शेवगाव शिवारातील हातगाव येथे दोन ठिकाणी दरोडा 72 हजारांचा ऐवज लंपास ; रहिवाश्यांना जबर मारहाण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:30
Rating: 5