Breaking News

चार तासाला एक बँक कर्मचारी अटकेत! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची धक्कादायक माहिती किमान दोन वर्षांत 5 हजार 200 कर्मचारी दोषी

बेंगळुरू : पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळयाची चर्चा सर्वत्र सुरू असतांना, रिझर्व्ह बँकेच्या माहितीनूसार देशात सरासरी 4 तासात एका बँक कर्मचार्‍याला अटक केली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या माहितीमुळे खळबळ उडाली असून, बँक प्रशासनाविषयी अनेक सवाल आता उपस्थित होवू लागले आहे. 

देशात सध्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याची सर्वत्र चर्चा आहे. या घोटाळ्याप्रकरणी बँकेतील काही माजी अधिकार्‍यांना देखील अटक करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या या आकडेवारीने भारतीय बँकिंग क्षेत्राचा पाया किती ठिसूळ झाला आहे याची कल्पना येते. एक जानेवारी 2015 ते 31 मार्च 2017 या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 5 हजार 200 कर्मचारी फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. या सर्व कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे तसेच त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. फसवणूक केल्याप्रकरणी दोषींमध्ये सर्वाधिक कर्मचारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे आहेत. या बँकेचे 1 हजार 538 कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यापाठोपाठ इंडियन ओव्हरसिस बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागलो. या बँकेचे अनुक्रमे 449 आणि 406 कर्मचारी दोषी आढळले आहेत. नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे 184 कर्मचारी अशा फसवणूकीत दोषी आढळल्याचे आरबीआयने म्हटले आहे.