Breaking News

ग्रामीण भागात स्‍वंयरोजगारासाठी कृती कार्यक्रम : विखे


राहाता प्रतिनिधी :- पंचायतराज व्‍यवस्‍थेतून मिळालेल्‍या विकासाच्‍या संधी साध्‍य करतानाच कौशल्‍य विकास कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात स्‍वंयरोजगारासाठी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून करणार आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांनी केले.
राहाता तालुक्‍यात नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्‍या सरपंच आणि सदस्‍यांचा सत्‍कार डॉ. धनजंयराव गाडगीळ सभागृहात विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी कारखान्‍याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, सभापती हिरा कातोरे, व्‍हाईस चेअरमन पोपटराव लाटे, प्रवरा बॅंकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, उपसभापती बाळासाहेब म्‍हस्‍के, मुळा प्रवराचे संचालक देवीचंद तांबे, प्रतापराव तांबे, अशोकराव गाडेकर, ‘गणेश’चे संचालक रावसाहेब शेळके, जिल्‍हा महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा कांचन मांढरे आदींसह जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍य उपस्थित होते.

विखे म्‍हणाले की, लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी दिलेला कौल आपल्‍या सर्वांनाच मान्‍य करावा लागतो. गावपातळीवर या निवडणुकीच्या निमित्ताने मतभेद झाले असतील. पण आता मनभेद होऊ देऊ नका. गावाच्‍या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्‍याची गरज आहे. सत्‍तेच्‍या विक्रेंदीकरणामध्‍ये आता पंचायतराज व्‍यवस्‍थेत ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. १३ व्‍या व १४ व्‍या वित्‍त आयोगाचा निधी सामाजिक रचनेप्रमाणे थेट ग्रामपंचायतीना मिळणार आहे. 

याप्रसंगी शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्‍या मोफत अपघात विमा योजनेअंतर्गत या कार्यक्रमात ८ कुटुंबांना प्रत्‍येकी २ लाख रुपयांचा धनादेश विखे यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आला. या कार्यक्रमास राहाता तालुक्‍यातील विविध संस्‍थांचे पदाधिकारी, ग्रामस्‍थ, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.