Breaking News

चीनचा पठारी भागात वेगवान युद्ध सराव


भारतासोबतच्या डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी लष्कराच्या सर्वच विभागांनी पठारी भागांतील खडतर प्रशिक्षणावर जोर देत देश व पदेशांतील आपला युद्ध सराव अधिक वेगवान करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे.
'राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गत ३ जानेवारी रोजी लष्कराला युद्धासाठी सदैव सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते. तद्नुसार पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए), नौदल, रॉकेट दल व सशस्त्र पोलिसांनी देशासह परदेशांत वेगवान लष्करी सरावाला प्रारंभ केला आहे,' असे वृत्त लष्कराच्या 'पीएलए डेली' या अधिकृत मुखपत्राने दिले आहे. 'रडारला चकवा देणारे जी-२० स्टील्थ विमान, वाय-२० परिवहन विमान, एच-६ बॉम्बफेकी विमान व जे-१६, जे-११बी व जे-१०सी आदी लढाऊ विमाने २०१८ च्या सुरुवातीपासूनच लष्करी सरावात सहभागी झाले आहेत,' असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या वृत्तात तिबेटचा उल्लेख 'पठारी भाग' म्हणून करण्यात आला आहे. हा भाग भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) चिकटून आहे.