पोलिसांच्या ‘मॉकड्रील’मुळे जिजाऊ चौकात तणाव
दि. १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे घडलेल्या दंगलीच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रभर दंगल पसरून अनेक जिल्ह्यात रास्तारोको, जाळपोळ, दगडफेकी सारख्या घटना घडल्या. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये अनेकजण जखमी झाले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले. सदर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत होते. त्याच अनुशंगाने दि. ११ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेदरम्यान राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी सर्व पोलिस कर्मचार्यांना राहुरी शहरातील जिजाऊ चौकात दंगल झाल्याची महिती देतं घटनास्थळी ताबडतोब हजर राहण्याचे आदेश दिले. काही काळाने पोलिसांचा मोठा फौजफाटा जिजाऊ चौकात जमा झाला. यावेळी राहुरीचा आठवडेबाजार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलिसांचा फौजफाटा पाहून नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीयुक्त वातावरण पसरले. मात्र परिस्थिती ध्यानात आल्याने उपस्थितांच्या जीवात जीव आला.
यावेळी पोलिस निरीक्षक राठोड यांनी राहुरीचे अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा व सोनई येथील पोलिस पथकाला राहुरीत दंगल झाल्याची माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले. मात्र हाकेच्या अंतरावर असलेले राहुरी नगरपरिषदचे अग्निशमन दल व रुग्णवाहिका तब्बल दीड तास उशिराने दाखल झाल्या. श्रीरामपूर येथील पोलिस पथक अडीच तास उशिरा आले. श्रीरामपूर वगळता कुठलेच पोलिस पथक हजर झाले नाही. जर खरोखरच दंगल झाली असती तर या पोलिसांची हलगर्जी वरिष्ठांनी माफ केली असती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
