शिक्षणाची वारी प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा प्रयत्न - विनोद तावडे
रत्नागिरी, दि. 12, जानेवारी - शिक्षणाची वारी उपक्रमाला राज्यातील शिक्षकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे केले.कोल्हापूर विभागातील सर्व जिल्हे, मुंबई विभागातील रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी रत्नागिरी येथे शिक्षणाची वारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यमनगरातील एमडी नाईक हॉलमध्ये तीन दिवस चालणार असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे शिक्षक शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत असल्याने त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करावी, यासाठी शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील विविध ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला जातो. यावर्षी लातूर, अमरावती, नाशिक आणि रत्नागिरी या ठिकाणी शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर आणि अमरावती येथील वारी यशस्वीपणे पार पडली असून हजारो शिक्षकांनी वारीला भेट दिली आहे. या शिक्षणाच्या वारीमध्ये गणित, भाषा, वाचन विकास, अध्ययनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, कृषियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन, अभिजात भाषा तसेच शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम शिक्षक सादर करणार आहेत. या शैक्षणिक प्रयोगांची सर्वांनी अनुभूती घेता यावी तसेच या प्रयोगाचा अंगीकार कसा करता येईल, हे शिक्षक ांना अनुभवता येणार आहे. वारीला शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक शिक्षक पुढे येऊन आपण केलेले प्रयोग इतरांसमोर सादर करत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. ही वारी प्रत्येक जिल्ह्यात झाली, तर तिचा आणखी प्रभाव जाणवेल. अनेक शिक्षकांना त्यात सहभाग घेता येऊ शकेल.
