Breaking News

वसईतील एटीएममधून तिघांचे पैसे लंपास

पालघर, दि. 27, जानेवारी - वसईतील तामतलाव येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील तिघांच्या खात्यांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक नायझेरीयन नागरिक सीसीटीव्हीत दिसून आला आहे.


मारिया डायस, हेलन आणि अशरफ शेख या तिघांच्या खात्यातून पैसे काढले गेल्याचा मॅसेज मोबाईलवर आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. मारिया यांच्या खात्यातून 10 हजार 500 रुपये, हेलन यांच्या खात्यातून 38 हजार रुपये आणि अशरफ यांच्या खात्यातून 33 हजार रुपये काढण्यात आले आहेत.
या तिघांनी बँक ऑफ बडोदाच्या तामतलाव येथील एटीएममधून वेगवेगळ्या वेळी पैसे काढले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एटीएममधून पैसे काढल्याचे उजेडात आले आहे. मॅसेज आल्यानंतर त्यांनी बँकेत विचारणा केली असता तिघांच्याही खात्यातून भाईंदर येथील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तिघांनीही याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ज्यावेळी तिघांनी एटीएममधून पैसे काढले त्यावेळी त्यांचा अकाउंड नंबर आणि पासवर्ड हॅक करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पैसे काढताना भाईंदर येथील एटीएमम सेंटरमध्ये एक नायझेरियन नागरिक आढळून आला आहे. त्यामुळे यामागे नायझेरियन टोळी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.