Breaking News

चौकशीअंती दोन संशयास्पद बोटी नौदलाच्याच असल्याचे निष्पन्न

पालघर, दि. 27, जानेवारी - पालघर जिल्ह्यातील झाई समुद्रकिनार्‍यापासून सुमारे दोन नॉटिकल परिसरात दोन स्पीड बोटी संशयास्पदरित्या फिरत होत्या. त्यांनी मासेमारी बोटींकडे मोर्चा वळविल्यानंतर मासेमारांनी तात्काळ किनारा गाठून तटरक्षक दल आणि पोलीसांना कळविले. त्यानंतर तत्काळ शोध मोहीम आखून स्पीडबोटींचा पाठलाग केला असता त्या नौदलाच्या स्वरा आणि सुरभी या स्पीडबोटी असल्याचे उघड झाले. शिवाय त्यांच्याकडे ओळखपत्र तसेच कागदपत्रांचा अभाव असल्याची माहिती तपासयंत्रणेच्या हाती आली आहे.


महाराष्ट्र गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील झाई या मासेमारी केंद्रावरून मांगेला समाज मच्छीमार सोसायटीची गीताप्रसाद ही बोट मासेमारीला गेली होती. त्यामध्ये जयवंत दवणे, रितेश दवणे, दीपक दवणे, गोविंद दवणे यांना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किनार्‍यापासून दोन नॉटिकल अंतर परिसरात पांढर्‍या - राखाडी रंगाच्या दोन स्पीडबोटी त्यांच्या जवळ येत असल्याचे लक्षात आले. या अनोळख्या बोटीवर कोणत्याही प्रकारचा ध्वज नव्हता, त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पाहून त्यांनी तत्काळ कि नारा गाठून झाई मांगेला समाज सोसायटीच्या माध्यमातून तटरक्षक दल आणि घोलवड पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी स्वाध्याय परिवार झाई यांची मत्स्यगंधा ही बोट आणि स्थानिक मच्छीमारांना घेऊन साडेआठच्या सुमारास समुद्रात शोध कार्याला सुरुवात केली.

तर डहाणू तटरक्षक दलाने दमण येथील तळावरून हेलिकॉप्टरला पाचारण करून शोध मोहिमेला प्रारंभ केल्याची माहिती कमांडन्ट एम. विजयकुमार यांनी दिली. पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही बोटींच्या टप्प्यात पोहचल्यावर त्यांना शरण येण्यास सांगितले. त्या वेळी आपण नौदलाच्या सर्व्हे विभागातील असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बोटीवर सिव्हील ड्रेसवर असलेल्या बारा व्यक्तींकडे ओळखपत्र आणि कागदपत्रांचा अभाव होता. आयएनएस जमुना या मुख्य बोटीच्या स्वरा बोटीचे लेफ्टनंट यश भारद्वाज आणि सुरभीचे लेफ्टनंट दीपक भाटी होते. त्यांच्यावर गुजरात राज्यातील खांबात (हाजीरा) ते उंबरगाव या परिसराचा हायड्रोग्राफीक सर्व्हेची जबाबदारी चौकशीत समोर आल्याचे स. पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले. 

या वेळी झाई किनार्‍यावरून उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे पथकासह हजर होते. साडेअक राच्या सुमारास कमांडन्ट एम. विजयकुमार यांनी तटरक्षकच्या टीमसह झाई जेटी गाठली.परिसरात काहीकाळ संशयाचे व घबराटीचे वातावरण पसरले होते. गुजरात राज्यातील समुद्रीभागाच्या सर्व्हेची जबाबदारी असताना या बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत काय करतात ? त्यांची कोणतीच माहिती सुरक्षायंत्रणेला कशी नाही? त्या स्पीडबोटी का पळाल्या ? त्यांचे मच्छीमारांकडे काय काम ? कागदपत्रे का नव्हती? या बाबी प्रश्‍न निर्माण करणार्‍या आहेत. दरम्यान सागरी सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्याचा दुष्परिणाम मच्छीमार आणि किनार्‍यालगत गावातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.