Breaking News

15 हजाराची लाच घेताना लेखाधिकार्‍याला अटक

पालघर, दि. 27, जानेवारी - मोखाडा पंचायत समितीचे लेखाधिकारी सुरेश गुरव यांना 15 हजाराची लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. त्यामुळे लाचखोर अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. 



मोखाडा तालुक्यातील सुर्यमाळ, आडोशी आणि नाशेरा या ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेतर्गत कामे करण्यात आली आहेत. केलेल्या या कामाची बिले 2 लाख 50 हजारांची होती. ती पारीत करण्यासाठी, मोखाडा पंचायत समितीचे लेखाधिकारी सुरेश गुरव यांनी येथील ग्रामसेवकांकडे 25 हजाराची लाच मागितली होती. अखेर 15 हजाराची तडजोड करण्यात आली होती. मात्र, सातत्याने विकास कामांची देयके पारीत करण्यासाठी सुरेश गुरव कडून पैशाची मागणी होत होती. त्यामुळे वैतागलेल्या ग्रामसेवकांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुरेश गुरव या लेखाधिकार्‍याला पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. मोखाडा पंचायत समिती मध्ये यापुर्वी ही शिक्षण विभागात अशीच घटना घडली होती.