Breaking News

छाती कितीही इंच असो, त्यात शौर्य पाहिजे : उद्धव ठाकरे

मुंबई : छाती कितीही इंच मोठी असली तरी त्यात शौर्य असणे महत्वाचे आहे. केवळ छाती मोठी असून उपयोग नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लगावला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.


यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरींच्या नौदलाविरोधात वक्तव्यावर देखील आक्षेप घेतला. नितीन गडकरींचे बोलणं ऐकून पायाची आग मस्तकात गेल्याचेही ते म्हणाले. तसेच ’नौदलात असलेले शौर्य तुमच्या 56 इंचाच्या छातीमध्ये नाही. त्यामुळे दुर्दैवाने तुमचे सरकार आहे. राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा घुसला आहे’, असेही ते म्हणाले. जे ठराव घेतले आहेत ते पूर्ण विचाराने घेतले असून केवळ औपचारिकता म्हणून ठराव घेण्यात आलेले नाहीत. फक्त हात वर करुन नाही तर मुठ आवळून संमती हवी आहे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. सरदार वल्लभभाई पटेल आज असते तर काश्मिर-पाकिस्तान-बांगलादेशचा प्रश्‍न कधीच मिटला असता. हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढलो नाही. आता नको ती लोक हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन डोक्यावर येऊन बसले आहेत. यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढणार असून जिंकलो, हारलो तरी हिंदुत्वाला अंतर देणार नाही अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.


विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वबळावर !2019 ला होणा-या विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे अशी घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या ठरावाला कार्यकारिणीत एकमताने मंजुरी मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे, चंद्रकात खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची नेतेपदी घोषणा करण्यात आली. तर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तसेच मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचेही नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे.