Breaking News

सामान्य कुंभाराला वेठीस धरण्याची खेळी

कुंभार...गावगाड्याचे महत्वाचे चाक. जन्मापासून मरेपर्यंत कुठलाही विधी असो वा उत्सव, सामाजिक सोहळा असो वा राजकीय समारंभ, गावकीला कुंभाराची आठवण झाली नाही ही आजवरची कुंभार समाजाची ऐपत आहे. हाच कुंभाराचा सामाजिक ऐवज आहे. गावकारभारात कुंभार समाजाला मानाचे पान वाढल्याशिवाय कारभाराची पंगत बसत नाही. व्रत यज्ञ वैकल्यातही या समाजाचा यथायोग्य मानसन्मान होतो. थोडक्यात आपल्या समाज व्यवस्थेत या समाजाला अगदीच उपेक्षित ठेवले गेले ही ओरड संयुक्तिक नाही. समाजव्यवस्थाच नाही तर राज व्यवस्थेतही कुंभाराची उपेक्षा होत नाही. हे वास्तव नाकारून समाजातील नेतृत्वाची हाव भरलेले काही विद्वान समाज व्यवस्था आणि राजव्यवस्था कुंभाराचे अस्तित्व नष्ट करण्यास टपले आहेत असा प्रचार करून सामाजिक आणि राजकीय वातावरण दुषित करीत आहेत. विशेषतः महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने येत्या 5 मार्च रोजी आयोजित केलेला मोर्चा या वातावरण दुषित करणार्‍या मंडळींचा हेतू स्पष्ट करतो. 


या मोर्चाच्या मागण्या काय आहेत, या मोर्चाचा हेतू काय आहे, मागण्या मांडण्यापुर्वी या मागण्यांच्या संदर्भात त्यांना असलेला अभ्यास, कुंभार समाजाविषयी एखादी मागणी करताना त्या मागणीशी संबंधित समाजाची सामाजिक स्थिती, समाजाचे व्यवस्थेतील स्थान इतकेच नाहीतर समाजाची आजची आर्थिक, व्यावसायिक, आणि अंतर्गत रोजी रोटी बेटी व्यवहार करतांना असलेली मानसिकता या बाबीबद्दल मोर्चा काढण्याची भाषा बोलणार्‍या कथित समाज पुढार्‍यांना कितपत जाण आहे. केवळ व्हॉटस अप, फेसबुक अशा सोशल माध्यमांमधून सरकार किंवा अन्य समाजाबद्दल गरळ ओकून समाजाला न्याय देता येत नाही, समाजमान्य नेता तर मुळीच होता येत नाही.

या मोर्चाची वल्गना करणार्‍या मंडळींचा आजवरचा इतिहास तपासल्यानंतर समाजाने या मंडळींवर आणखी किती दिवस विश्‍वास ठेवायचा अशी कुजबुज मोर्चाच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागताच सुरू झाली आहे. दिव्याने कितीही जग उजळायचा प्रयत्न केला तर त्याच्या बुडाखाली असलेला अंधार दिवाही दुर सारू शकत नाही. दिवा अवतीभोवतीचा काही भाग उजळू शकतो. अवघे विश्‍व उजळण्याची क्षमता फक्त सुर्याकडे असते. सुर्य होण्याची पात्रता अंगी येण्यास या मंडळींना सात पिढ्या शक्य नाही.दिव्याचे पावित्र्य या मंडळींकडे नाही. मग रात काजव्या प्रमाणे प्रासंगीक चमकोगीरी करण्याची लत या मंडळींना जडली आहे. 5 मार्च हा मोर्चा समाजाची अस्मिता आणि स्वाभीमान आहे,अशी आवई या कथित समाज पुढार्यांनी उठवली आहे.समाजाच्या कुठल्या अस्मितेविषयी,स्वाभीमानाविषयी ही मंडळी भाष्य करते आहे.या मंडळींना कुठल्या प्रकारची अस्मिता किंवा स्वाभीमान अपेक्षित आहे.मोर्चा काढून अस्मिता किंवा स्वाभीमान मिळवता येतो हा कुठला सिध्दांत ही मंडळी मांडू पहात आहे,आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की,ज्या स्वाभीमान किंवा अस्मितेची चर्चा हे विद्वान करू पाहतात त्या समाज स्वाभीमानाला डंख कुणी मारला? समाजाच्या अस्मितेचा लिलाव कुणी केला? या प्रश्‍नांची खरी उत्तरे देण्याची हिम्मत ही मंडळी का दाखवित नाहीत.

या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत तरी समाजाला माहीत आहेत. कुंभार समाजाला लावण्यात आलेल्या गौण खनिज कराचा बागूलवुवा करून ही मंडळी थेट घटनेलाच नाकारत आहेत.डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत हा मुद्दा निकाली काढला आहे. जो कुंभार स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतः माती काम करतो,मातीशी त्याचे ऋणानुबंध आहेत त्या कुंभाराला माती काम म्हणजे गौण खनिज कर माफ करण्याची तरदूत डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच केली आहे. मग ही मंडळी कुठल्या आधारावर गौण खनिज कराचा बाऊ करीत आहेत.सामान्य कुंभाराचा हा प्रश्‍नच नाही.धनदांडगे,भांडवलदार कुंभार स्वतः मातीशी खेळत नाहीत.त्यांचे पोट भरले आहे.कुंभाराच नाही इतर समाजातील पगारी माणसं मजूरीवर आयात करून ही भांडवलदार मंडळी व्यावसायिक माती काम करीत असतील,धंदा करून नफा कमवत असतील तर त्यांना गौण खनिज कर भरून राष्ट्रीय गंगाजळीत भर घालण्यास त्यांना काय धाड भरली.ही मागणी अखिल कुंभार समाजाच्या अजेंड्यावर घेऊन चार दोन टक्के धनवान कुंभाराचे भले करण्यासाठी हा मोर्चा आहे का? सामान्य कुंभाराला भेडसावणार्या ,त्याच्या अस्मितेशी ,स्वाभीमानाशी संबंधीत इतर आडचणींचे या चार दोन पुढारी म्हणविणार्या टोळक्याला काहीच सोयरसुतक नाही का?

खरा मुद्दा हाच आहे.आज माती कामापासून कुंभार दूर जात आहे.जी कुंभाराची मुले माती काम करून स्वाभीमानाने जगतात त्यांचा वैवाहिक प्रश्‍न ऐरणीवर आला आहे,माती काम करणार्या कुंभाराच्या मुलाला दुसरा कुंभार मुलगी देण्यास धजावत नाही.इथे नाही का या मंडळींची अस्मिता जागी होत!आणि या चार दोन पुढार्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावे की,किती पुढार्यांनी आपल्या मुलीचा विवाह माती काम करणार्या मुलाशी लावून दिला किंवा भविष्यात लावून देतील.ही हिम्मत ते कधीच दाखविणार नाहीत.कारण अशी उदाहराणच या मंडळींकडे नाहीत.अन् अस्मिता स्वाभीमानाच्या बाता मारतात.
मोर्चाच्या अजेंडावर दुसरी एक मागणी आहे कुंभाराला एनटी प्रवर्गात समावेशीत करण्याची. ही मागणी या मंडळींच्या अकलेचे दिवाळे काढणारी आहे.आपल्या देशात मागास वर्ग आयोग नावाची घटनात्मक व्यवस्था आहे.या व्यवस्थेचा अभ्यास करण्याची तसदी घेतली असती तर हसू ओढवून घेण्याची नौबत या पुढार्यांवर आली नसती.एका विशिष्ट प्रवर्गात समावेश होण्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या निकषांची पुर्तता करावी लागते.एनटीसाठी मागासवर्ग आयोगाला अपेक्षित असलेले निकष कुंभार पुर्ण करू शकतात का? या स्वघोषीत विद्वान पुढारी तरी निकष पुर्ण करतील का? समाजाला वेड्यात काढण्यासाठी एका गावाहून दुसर्या गावाला गेले म्हणजे भटके होता येत नाही.

समजा या पुढार्यांना मागासवर्ग आयोगाने त्यांची मागणी अनपेक्षितपणे मान्य केली तरी कुंभाराला त्या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ कसा होईल हे तरी ही मंडळी ठामपणे सांगु शकतील का? एनटी प्रवर्गात समावेश झाल्यानंतर वंजारा समाजाची आरक्षणासंदर्भात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास या मंडळींना आहे का?वस्तुस्थिती अशी आहे की एनटी प्रवर्गात समावेश झाल्यानंतर महाराष्ट्रात भटके विमुक्त म्हणून ओळखला जात असलेला वंजारा समाज देशपातळीवर ओबीसी म्हणूनच ओळखला जातो.एनटी प्रवर्गाला असलेल्या केंद्रशासनाच्या आरक्षण धोरणाच्या कुठल्याही सवलतीचा लाभ मिळत नाही.घरच्या मंडळींची उपासमार सुरू असतांना कुंभाराचा पाहूणा त्या घरात मुक्कामाला ठेवून ही मंडळी काय साध्य करीत आहेत. आगीतून समाजाला बाहेर काढण्याचे ढोंग करून रणरणत्या वाळवंटात सोडण्याचे पाप ही मंडळी करीत आहे.

मोर्चाचे आयोजन करणार्‍या महासंघाला समाजाची मान्यता आहे का? या महासंघाची नोंदणी कुणी केली ? कुठे केली? महासंघाचे नोंदणीकृत पदाधिकारी कोण आहेत? आज पदाधिकारी म्हणून डगले घालून मिरवणार्या मंडळींची धर्मादायकडे नोंद आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे या मंडळींचे पितळ उघडे पाडण्यास पुरेसे आहे.या मंडळींनी मोर्चाचे आयोजन जाहीर करण्यापुर्वी कुठे बैठक घेतली? या बैठकीला समाजाला पाचारण करून विश्‍वासात घेतले का? बैठकीचे प्रोसिडींग, मिनिटस लिहिलेत का? या प्रश्‍नही या मंडळींच्या विश्‍वासार्हतेवर शंका उपस्थित करतात. सन 1997-98 मध्ये जे मयत झाले अशा हयात नसलेल्या व्यक्तींच्या सन 2004-05 मध्ये सह्या करून समाजाची फसवणूक करणारे हे भामटे कुठली अस्मिता आणि स्वाभिमान समाजाला शिकविण्याचा शहाजोगपणा करतात?

कुंभार समाजाचा 5 मार्चला आयोजित केलेला मोर्चा अनेक अर्थाने समाजाला कित्येक वर्ष पिछाडीवर नेण्यास कारणीभूत ठरणार आहे. या मोर्चासाठी तयार केलेल्या मागण्या वस्तुस्थितीशी विसंगत असल्याने एकूण समाजाविषयी व्यवस्थेत नकारात्मक भावना तयार होणार आहे. मुळात हा मोर्चा समाजाच्या हितासाठी नाही तर समाजाच्या खांद्यावर मोर्चाचे ओझे लादून शासन प्रशासनावर दबाव टाकण्याची खेळी या मंडळींनी खेळली आहे.मोर्चाचे आवाहन करण्यासाठी सोशल मिडीयावर या मंडळींकडून व्हायरल केला जाणारा मजकूर याची प्रचिती देतो.या मजकूरात अखिल कुंभार समाजाला सरकारच्या खलनायक ठरविण्याचा कुटील डाव खेळला गेला आहे.वस्तुस्थिती वेगळी आहे.कुंभार समाज सरकारविरोधी नाही मग ते कुठल्याही पक्षाचे असो,सामान्य कुंभार 
सरकारशी प्रतारणा करीत नाही.माञ मोर्चाचे आवाहन करणार्या मंडळींना समाजाला व्हिलन बनवून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे.

यातील अनेक मंडळी सरकारच्या मेहेरबानीवर जगत आहेत.उदाहरणादाखल महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळात काम करणारे कुंभार समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष तटेवार यांनी कुंभार समाजातील तरूणांचे माथे सरकारविरूध्द भडकावणारा मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.त्यांनी आपल्या मजकूरात सरकारला अहंकारी मस्तवाल अशी हेटाळणी करणारे,तरूणांना भडकावणारे नामाभिधान लावले आहे.यावरून या मंडळींचा उद्देश तरूण सरकारविरूध्द रस्त्यावर उतरवून तमाशा करणे हाच असल्याचे स्पष्ट होते.या मंडळींच्या या कारवाया समाज आणि कायदा सुव्यवस्थेसाठी हानीकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांच्याविरूध्द प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याची भावना समाजातून व्यक्त केली जात आहे. 

प्रश्‍न सुटणार असतील तर मोर्चा कशासाठीकुंभार समाजाच्या प्रमुख मागण्यामधील मातीकला बोर्डाचा प्रश्‍न महत्वाचा आहे. मात्र हा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होऊ घातलेल्या 11 फेबु्रवारीच्या इस्लामपूर मेळाव्यात मातीकला बोर्डाचा प्रश्‍न सोडवतो, असे आश्‍वासन कुंभार समाजाचे युवक नेते नंदकुमार कुंभार इस्लामपूर, सोमनाथ कुंभार, रमेश कुंभार(अंकलीकर) या तिघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी राज्यमंंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमक्ष दिले. जर कुंभार समाजाचे प्रश्‍न सुटत असतील, तर मोर्चोचे आयोजन कशासाठी असा सवाल निर्माण होत आहे. यासंदर्भात सविस्तर वाचा उद्याच्या अंकात