Breaking News

अग्रलेख - झुंडशाहीला वेसन घालण्याची गरज

देशात कायद्यांचे राज्य स्थापित होऊन आज 68 वर्षांचा कालावधी झाला असला, तरी या देशात आपलीच हुकमत असावी अशी काहीजणांची सुप्त इच्छा आहे. त्यासाठी कायद्यांच्या अधिष्ठानाला महत्व न देता, कायद्यालाच आव्हान देण्याचा प्रयत्न काही तथाकथित संघटना करतांना दिसून येत आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात झुंडशाहींचा उपद्रव वाढत चालला आहे. या झुंडशाहीला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आपण कमी पडलो की काय? अशी शंका आता येऊ लागली आहे. त्यामुळेच देशभरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला किंवा कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करतांनास दिसून येत आहे, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होतांना दिसून येत नाही. पद्मावत या सिनेमाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतरही या निर्णयाविरोधात काही संघटनांनी रस्त्यावर उतरून आक्षेप नोंदवत हा सिनेमा बंद पाडण्याची धमकी दिली. तर या सिनेमाची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे, ज्येष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांच्यासह सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना देखील धमकी देखील देण्यात आली आहे. 

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने, सर्वोच्च न्यायालयाची देखील परवानगी मिळाली आहे. तरी या चित्रपटाला विरोध करणे, आणि त्यासाठी रस्त्यावर उतरणे, कायदा हातात घेणे, या बाबी झुंडशाहीला पोषकच ठरत आहे. त्यामुळे पद्मावत चित्रपटाला संबधित राज्यांनी संरक्षण देणे महत्वाचे आहे. पद्मावत चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना कात्री लावण्यात आली आहे. तसेच या सिनेमांचे नावांत देखील बदल करण्यात आला आहे. वास्तविक सिनेमा हा माध्यम इतिहास दाखवत असतांना, त्यांचे वस्तूनिष्ठपणे चित्रण करण्यासोबत वास्तविकता दाखविणे आवश्यक आहे. त्याचसोबत हा सिनेमा रटाळ होणार नाही, यासाठी काही काल्पनिक पात्र असेल, किंवा काही दृश्यांचा समावेश करण्यात येतो. त्याचा अनेकांना विसर पडल्यामुळे, अशा सिनेमांना विरोध करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ज्याप्रकारे पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून, तो काही तथ्ये तर्कांच्या आधारे मांडत असतो. तसेच दिग्दर्शक सुध्दा एखाद्या ऐतिहासिक विषयांचा अभ्यास करून, तो विषयांचे कथानक लिहित असतो. त्या कथानकांतील पात्र तो आपल्या विवेकपध्दतीने रंगवत असतो. त्यामुळे चित्रपट न बघता त्याला तीव्र विरोध करणे आक्षेपार्ह असून, ही अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची गळचेपी करण्याचे धोरण काही झुंडशाहीकडून आखण्यात येत आहे. आणि त्याला काही तथाकथित संघटना आर्थिक रसद पुरवत असतात. ही झुंडशाही हक-नाक निरपराध लोकांचा जीव घेतांना दिसून येत आहे. मात्र या झुंडशाही काही अचानक जन्माला येत नाही. त्या झुंडशाहीला पोसणारे, कायद्याचे कवच बहाल करणारे, अर्थपुरवठा करणारे, असतात त्यामुळे झुंडशाहीची वाढ होते, आणि ते सामाजिक शांतता बिघडवत विशिष्ट चिवारसरणीचा प्रचार आणि प्रसार करत असतात. गोरक्षा करण्यासाठी अशाच तथाकथित झुंडशाही आजमितीस रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या झुंंडशाहीकडून निरपराध लोकांचा जीव घेण्यात येतो.