नेवासा बुद्रुक ला मिळाला तीर्थस्थानांचा क वर्ग दर्जा
नेवासा तालुका हा विविध तीर्थक्षेत्रांचा तालुका आहे. नेवासा शहर व नेवासा बुद्रुक ही जोडगावे आहेत. ६ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नेवासा बुद्रुक परिसरातील सच्चिदानंद बाबा व नारदमुनी मंदिर देवस्थान, श्री खंडोबा मंदिर व सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान या स्थानांना क वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या या तीर्थक्षेत्रांना आता शासनाकडून निधी येणार आहे. त्यामुळे या तीर्थस्थानांच्या ठिकाणी पर्यटन व भाविकांच्या सुविधा उभ्या केल्या जातील.
ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंद बाबा व भारतातील नारदमुनींचे एकमेव मंदिर असलेल्या मंदिर देवस्थानला देखील क वर्ग दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच दूरदर्शनवर झालेल्या खंडोबा मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेल्या म्हाळसेचे माहेर असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा मंदिर व सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान या संस्थेस देखील क वर्ग दर्जा देण्यात आला. भाविकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
