चीफ जस्टिस दीपक मिश्रा आणि जस्टिस ए एम खानविलकर, जस्टिस डी व्हाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशीवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी केली. खंडपीठाने यावरील सुनावणी 15 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्रातील पत्रकारांनी केली होती. या प्रकरणात विविध पोलिस अधिकारी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे नाव आहे. नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकार्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले. न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका 8 जानेवारी रोजी बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचार्यांसह 23 आरोपींवर या प्रकरणी केस दाखल आहे.
न्या. बी. एच. लोया यांचा संशयास्पद मृत्यूप्रकरणाचे पडसाद
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:00
Rating: 5