Breaking News

उभादांडा येथे पाडगावकरांचे स्मारक उभारण्यास एमटीडीसीचा हिरवा कंदील


सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या उभादांडा या जन्मगावी ’काव्यशिल्प’ स्मारक उभारण्यास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनी 10 मार्च रोजी सागरेश्‍वर येथील पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत कविवर्य मंगेश पाडगावकर स्मृती ’काव्यशिल्पाचे’ भू मिपूजन कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते व्हावे आणि स्मारकाला चालना मिळावी अशी मागणी सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्रासह जिल्ह्यातील साहित्यीकांमधून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, पाडगावकर यांच्या स्मारकासाठी मुंबई, पुणे येथे सुयोग्य जागा उपलब्ध होत नसल्याने स्मारकाचा प्रस्ताव रखडला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अतुल हुले यांनी पाडगावकर यांच्या जन्मगावी म्हणजे उभादांडा ( वेंगुर्ले ) येथे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला हुले आणि पाडगावकर यांचे चिरंजीव डॉ.पाडगावकर उपस्थित होते. या बैठकीत उभादांडा-सागरेश्‍वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत ’कवितांचे गाव’ या प्रस्तावावर चर्चा झाली. या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली गेली. ’काव्यशिल्प’ स्मारक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त सहभागातून उभारण्यात येणार आहे.