Breaking News

आत्मा मालिक खेळाची पंढरी : खुरंगे ‘चला खेळूया’ स्पर्धा उत्साहात


कोपरगांव ता. प्रतिनिधी :- ‘चला खेळूया’ या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक चांगली संधी या निमित्ताने मिळत आहे. नगर जिल्ह्यातील व राज्यातील खॆळाडूंसाठी आत्मा मालिक खेळाची पंढरी बनली आहे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी प्रतिपादन केले. 
‘चला खेळूया’ या स्पर्धेत १४६ पदकांसह कोपरगावने प्रथम बाजी मारली. जिल्हास्तरीय पार पडलेली ही स्पर्धा दि. १९ ते २१ जानेवारी या कालावधीत आत्मा मालिक क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे कौतुक केले. 

नगर जिल्ह्यातील एकुण ४ हजार २१० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे इयत्ता नर्सरी ते केजी मधील ५२ विद्यार्थी तर इयत्ता १ ली ते इयत्ता २ री चे १०२ विद्यार्थी असे लहान गटात असे एकूण १५४ विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी च्या गटामधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यात एकूण १ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना खेळाच्या स्पर्धा खेळण्याची संधी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचे संकल्पनेतील ‘चला खेळूया’ या स्पर्धांमुळे मिळाली. 

या स्पर्धांच्या नियोजनासाठी आत्मा मालिकचे ४ कॅम्पसधील एकूण २८ मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. ६० क्रीडा शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पाडल्या. जिल्हयामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने सलग शाळास्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर या क्रीडा स्पर्धा पार पाडल्या. याबद्दल पुढील होणाऱ्या ‘चला खेलूया’ या उपक्रमाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा ‘आत्मा मालिक’मध्येच पार पडतील, अशी आशा व्यक्त केली. या स्पर्धा दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान घेण्यास त्यांनी मान्यता दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, महसूल कार्यालय आणि जिल्हयाच्या शिक्षण विभागाने उत्साहात भाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आभार मानले.