हिंसाचाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार,वढू बुद्रुक ग्रामस्थांचा आरोप.
पुणे : 1 जानेवारीला भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराशी आमचा काहीही संबंध नसून, दंगली उसळत आहेत. धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये भेदाभेद केला जातो आहे, महाराष्ट्र बंद झाला मात्र झालेला प्रकार दुर्दैवी आहे. काही समाजकंटकांनी केलेल्या कृत्याची फळे आम्ही आत्ताही भोगत आहोत, अशी भूमिका शुक्रवारी भीमा कोरेगावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मांडली. या अनुचित प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार असून, प्रशासनाने पुरेशी सुरक्षा दिली नाही, असा आरोप गावकर्यांनी केला यावेळी आहे.
आम्ही अनेकवर्षांपासून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहोत. आमच्यात आपसात कुठलाही वाद नाही. बाहेरच्यांनी इथे येऊन हिंसाचार केला. उलट कोरेगाव-भीमावर अन्याय होत आहे. मागच्या तीन दिवसांपासून लाईट-पाणी नाही अशी इथे अवस्था आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. कोरेगाव-भीमामध्ये मोठया प्रमाणावर तोडफोड, जाळपोळ झाली. लवकरात लवकर शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरवर्षी इथे लाखोंच्या संख्येने लोक येतात. शासनाने आवश्यक बंदोबस्त न ठेवल्याने हिंसाचार घडला असे गावकर्यांनी सांगितले. 1 जानेवारीला माता, महिलांवर अत्याचार झाले. थरकाप उडवणार्या गोष्टी आमच्या डोळयासमोर घडल्या असे मराठा समाजातील एका महिला प्रतिनिधीने सांगितले. या हिंसाचारात मराठा समाजातील मुलगा राहुल फटांगडेचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत द्यावी अशी मागणी मराठा समाजातील महिला प्रतिनिधीने केली.
ग्रामस्थांनी घेतलेल्या या बैठकीत गोविंद गायकवाड यांची समाधीही नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. संभाजी महाराजांची जंयती आणि पुण्यतिथी सर्व ग्रामस्थ यापुढे एकत्रितपणे साजरी करणार आहेत. तसेच यापुढे गावाबाहेरच्या संघटनांनी आमच्या इथे येऊन गावातले वातावरण कलुषित करू नये, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली. एवढेच नाहीतर दोन्ही बाजूच्या गटांनी परस्परांविरोधातल्या तक्रारी मागे घेण्यासोबतच गावातल्या मुंलाविरोधातले अॅट्रॉसिटीचे गुन्हे देखील मागे घेण्याची तयारी गोविंद गायकवाड यांच्या वंशजांनी दर्शवली. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाच्या 200 व्या शौर्य दिनाच्या काही दिवस आधी या वढू बुद्रुक गावात गोविंद महार यांच्या समाधीवरील पत्र्याचे शेड पाडल्यावरून आणि तिथला संभाजी महाराज समाधी विषयीचा ऐतिहास माहितीचा फलक फाडल्यावरून वाद दोन गटात वाद उत्पन्न झाला होता.
त्यातून या आणि आजूबाजुच्या गावांमधील 50 मुलांविरोधात अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण झाली आणि त्यातूनच सणसवाडीतली दंगल पेटली होती. पण या दंगलीशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा वढू बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी आजच्या बैठकीनंतर केला. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज वढू गावात पुन्हा दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्र येत घेतलेल्या बैठकीत येथील गोविंद गायकवाड समाधीचे इतिहास कालीन संदर्भ मिळाल्यानंतर त्यानुसार गोविंद गायकवाड समाधीजवळ फलक लावून समाधीस्थळही पूर्ववत करण्याचा सकारात्मक निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
