Breaking News

अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करून पत्रकारांच्या कल्याणासाठी वचनबध्द - ना. कर्नल राजवर्धनसिंग राठोड

नवीदिल्ली/नाशिक/प्रतिनिधी।11: माध्यम क्षेत्रांत कार्यरत असलेल्या बोगस माध्यम प्रतिनिधींच्या कारवायांमुळे प्रामाणिकपणे काम करणार्‍या पत्रकारांना बदनामीला सामोरे जावे लागते. केवळ पैसा कमावण्याचा हेतू ठेवून या पवित्र व्यवसायाला अवैध मार्गावर नेणार्‍या प्रवृत्तींचा बंदोबस्त करून खर्‍या प्रामाणिक माध्यम प्रतिनिधींच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय कटीबध्द आहे, असे आश्‍वासन केंद्रिय माहिती व प्रसारण राज्य मंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोड यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघांच्या शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर दिल्लीस्थित माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना दिले.

पत्रकार दिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजे शुक्रवार दि. 5 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल जैन-बागमार यांच्या नेतृत्वाखाली खा. हेमंत गोडसे यांच्या विशेष उपस्थितीत महासंघाच्या शिष्टमंडळाने ना. कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड यांची भेट घेऊन पत्रकारांना भेडसावणार्‍या विविध प्रश्‍नांवर जवळपास वीस मिनिटे चर्चा केली. चर्चेदरम्यान खा. हेमंत गोडसे, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल जैन-बागमार, महासचिव कुमार कडलग यांनी पत्रकारांच्या विशेषतः ग्रामिण भागात वृत्तसंकलन करणार्‍या पत्रकारांची एकूण आर्थिक ससेहोलपट शासकिय आणि सामाजिक अवहेलना, अनेकदा पुर्वग्रह ठेऊन दाखल केले जाणारे खोटे गुन्हे अशा विविध मुद्यांवर चर्चा करून वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. शासकीय पातळीवर पत्रकारांविषयी असलेली उदासिनता यावर ना. राठोड यांचे लक्ष वेधून पत्रकारांना धोरणात्मक योजनांच्या लाभ प्रक्रीयेत सामावून घेण्यासाठी माध्यम आस्थापनांकडून शिफारस केलेल्या माध्यम प्रतिनिधींना वर्ग 1 च्या सक्षम शासकीय अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे ओळख पत्र प्रदान करावे, या पात्रतेतील पत्रकारांची शासन पातळीवर नोंद करण्यात यावी आणि कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर पत्रकार कल्याण मंडळाची स्थापना करून कामगारांना मिळणार्‍या विविध योजनांप्रमाणे पत्रकारांना लाभदायी योजना अंमलात आणाव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदनही ना. राठोड यांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळाच्या भावनांशी सहमती दर्शवुन कर्नल ना. राजवर्धनसिंग राठोड यांनी पत्रकारीतील अपप्रवृत्तींचा विशेषतः न्यूज पोर्टलची वाढती संख्या, प्रसार भारतीकडे नोंदणी नसलेले केबल, डिश न्यूज चॅनेल्स आणि त्यांच्या प्रतिनिधींची वाढती संख्या हे सरकारसमोर आव्हान बनले आहे. यातूनच अपप्रवृत्ती जन्माला येत असल्याचे निरिक्षण चर्चेदरम्यान ना. राठोड यांनी नोंदविले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिष्टमंडळांशी झालेल्या चर्चेनंतर माहीती आणि प्रसारण राज्य मंत्र्यांनी नवी दिल्लीच्या माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना पत्रकारीतेतील अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करून प्रामाणिक पत्रकारांच्या कल्याणासाठी कटीबध्द असल्याचे सुतोवाच केले. 
इंटरनेटवर सुरू असलेले न्यूज पोर्टल, प्रसार भारतीकडे नोंदणी न केलेले केबल किंवा डिशवर प्रसारण होत असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना प्रतिनिधी नियुक्त करण्याचे किंवा त्यांना ओळखपत्र देता येणार नाहीत, असे ओळखपत्र धारक प्रतिनिधी आढळल्यास त्यांच्या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत, आर एन आय नोंदणीकृत वृत्तपत्र आणि प्रसारभारतीकडे नोंदणी असलेले न्यूज चॅनल आणि त्यांचे ओळखपत्र धारक प्रतिनिधी हेच अधिकृत मानले जातील असेही ना. राठोड यांनी दिल्ली माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. महाराष्टˆ राज्य पत्रकार महासंघाच्या शिष्टमंडळात सतिश रूपवते, गुलाब मनियार, हेमंत बागुल, अमोल सोनवणे, सागर केदारे, संदेश केदारे, संदीप नवसे, डॉ. दत्तात्रय शिरोडे, विनोद खरात आदी पत्रकारांचा समावेश होता.

पत्रकार अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काम करून लोकशाहीचे खर्‍या अर्थाने संवर्धन करीत आहे. विशेषतः ग्रामिण भागात पत्रकारांना कौटूंबिक गरजा भागवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना त्यांच्या कष्टाचा परतावा मिळावा, शासनाच्या इतर घटकांना मिळत असलेल्या विविध योजनांचा लाभ पत्रकारांना मिळायला हवा. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासन - प्रशासन पातळीवर पाठपुरावा करील.’’
खा. हेमंत गोडसे, 
लोकसभा सदस्य, नाशिक.

देशपातळीवर पत्रकार क्षेत्राला भेडसावणार्‍या अडचणींची जाणीव आहे. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ हा अनुभव या क्षेत्रातही येत असून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अपप्रवृत्तींचा अमर्याद वावर समस्यांच्या काही कारणांपैकी एक कारण आहे. या क्षेत्रातील प्रामाणिक पत्रकारीतेच्या संवर्धनासाठी सरकार वचनबध्द आहे.’’
ना. कर्नल राजवर्धनसिंग राठोड
राज्यमंत्री, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार.


पत्रकारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करून घेणे हे महासंघाचे मुख्य ध्येय आहे. शासनाने हलाखीचे जीवन जगणार्‍या, प्रतिकुल आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक अवहेलना झेलत लोकशाहीचे संवर्धन करणार्‍या पत्रकारांना कल्याण मंडळाची भेट दिल्यास बहुतेक प्रश्‍न मिटतील. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंञी ना. कर्नल राजवर्धनसिंग राठोड यांच्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेने महासंघाच्या आशा पल्लवित झाल्या असून केंद्र सरकार नजिकच्या भविष्यात पत्रकारांना ही अमुल्य भेट देण्याच्या दिशेने पाऊल उचलेल अशी अपेक्षा आहे. नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांचे गांभिर्य ओळखून नामदारांची भेट घडवून आणण्यात दाखवलेली तत्परता आणि प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेऊन पत्रकारांच्या भावनांना न्याय मिळावा म्हणून ना. राठोड यांच्याकडे केलेली रदबदली स्वागतार्ह आहे. पत्रकारांच्या या मागण्या मान्य होईपर्यत महासंघ राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर सतत प्रयत्नशील राहील.’’ 
डॉ.राहुल जैन-बागमार, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्रराज्य पत्रकार महासंघ