Breaking News

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे सांगितले. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-2018 मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. दौर्‍याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्लिन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकर्‍यांसाठी व्हॅल्यूचेन, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर यावेळी व्यापक चर्चा झाली.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले, विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या फोरमच्या मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.

25 लाख शेतकर्‍यांना सहभागी करणार
क्लिन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून व्हॅल्यूचेनला अधिक चालना देऊन राज्यातील 25 लाख शेतकर्‍यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर, बँकांसोबत व्यापक भागीदारी, प्रत्यक्ष पीकपद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा या विषयांवरही चर्चा झाली. ही चर्चा अन्न सुरक्षा, शाश्‍वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्‍वत शेतीकडे अधिक चांगली वाटचाल करण्यासाठी निश्‍चितपणे उपयोगी ठरेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.