Breaking News

उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर


तंत्रशिक्षण, दूरशिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्थी प्रवेश आदी विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र देशपातळीवर केल्या गेलेल्या उच्च शिक्षण सर्वेक्षणातून समोर आले आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणाची देशातील सद्य:स्थिती दर्शविणारा 2016-17 चा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले.

देशात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रात 9 लाख 40 हजार 480 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे, तामिळनाडू 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसह दुसऱ्या तर दिल्ली 7 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशासह देशात तिसऱ्या स्थानावर आहे.