Breaking News

आठवड जि. प. शाळेत मुलींसाठी आरोग्यविषयक चर्चासत्र उत्साहात


अहमदनगर ता. प्रतिनिधी - तालुक्यातील आठवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी ‘आरोग्य व घ्यावयाची काळजी’ या विषयावरील चर्चासत्र नुकतेच पार पडले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राठोड यांनी किशोरवयीन मुलींना आपले आरोग्य, घ्यावयाची काळजी व मुलींची सुरक्षा याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. लता साळुंके यांनी मुलींचा शारीरिक विकास व मानसिकता याविषयावर मार्गदर्शन केले. आरोग्यसेविका लता गुंजाळ यांनी मुलींनी आरोग्य कसे सांभाळावे व स्वछतेबाबत कसे जागरूक रहावे याबाबत प्रबोधन केले. 

अंगणवाडीसेविका निर्मला दाताळ, सुनीता मोरे, सुनंदा वाटाडे, सुनीता दाताळ यांनीही विविध विषयांवर प्रबोधन केले. यावेळी किशोरवयीन मुलींनी मनोगत व्यक्त केले. या चर्चासत्रात शाळेतील किशोरवयीन विद्यार्थिनी, त्यांच्या माता व गावातील महिला उपस्थित होत्या. या शालेय उपक्रमास सरपंच राजेंद्र मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद मोरे यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती राठोड यांनी सांगितले.