Breaking News

माथाडी कामगार लाक्षणिक संपाला व्यापा-यांसह सर्व घटकांचा उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई, दि. 31, जानेवारी - 36 माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळाचे विलिनीकरण करुन एकच माथाडी मंडळ करण्यासाठी शासनाने समितीची स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णया विरोधात आज राज्यातील माथाडी कामगार संघटनांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. याला मुंबई कृषिी उत्पन्न बाजार पेठांतील व्यापा-यांसह सर्व घटकांनी बंद ठेवून उत्तम प्रतिसाद दिला. या लाक्षणिक बंद नंतरही माथाडी प्रतिनिधीना या समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही, तर विधान भवनावर धडक मोर्चा नेण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.


मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल 12 हजार कोटींच्या घरात आहे. त्या नुसार एका दिवसात सर्व बाजारात 32 ते 33 करोडच्या घरात आर्थिक उलाढाल होत असते. आज पाच हि बाजारातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने हि आर्थिक उलाढाल हि ठप्प झाली आहे. बाजार समिती मधील पाचही बाजारात आज सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे मुंबई व उपनगरात भाजीपालयासह अन्य शेतमाल पोहोचू शकला नाही.
शासनाने अशा प्रकारे अध्यादेश काढून माथाडी कायदा व माथाडी मंडळांच्या योजना मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप माथाडी कामगारांनी केला आहे. शासानाच्या वरील निर्णयाच्या विरोधात माथाडी कामगारांनी तीव्र आक्षेप घेत समितीवर माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या संघटनांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेण्याची मागणी केली आहे.