Breaking News

अग्रलेख - धर्मा पाटील यांची आत्महत्या नव्हे हत्याच


महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची सरकारी नावाच्या यंत्रणेकडून होणारी पिळवणूक अजून किती बळी घेणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या महाराष्ट्राला नव्या राहिल्या नाहीत. नव्या राहिल्या नाहीस असे म्हणण्याचे धाडस असे की, शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असतांना सरकार चिडीचूप साधते, शेतकर्‍यांच्या आत्महत्यामध्ये सरकारला विरोधकांचे राजकारण वाटते. शेतकरी आत्महत्या करतो, त्याची शासकीय यंत्रणेकडून पिळवणूक होत असतांना, ही यंत्रणा ढिम्म कशी राहू शकते. सरकारी यंत्रणेने आपली संवेदनशीलताच गमावली आहे का? असा प्रश्‍न निर्माण होतो. धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन सरकारने औष्णिक विद्युत केंद्रासाठी संपादित केली होती. मात्र योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांना मंत्रालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या होत्या. सरकारदरबारी काहीच होत नसल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वास्तविक या शेतकर्‍याला विष प्राशन का करावे लागते. हा महत्वाचा प्रश्‍न आहे. या शेतकर्‍यांचे वय 85 असून, त्यांच्या वयाचा तरी आदर सरकारी यंत्रणेने आणि खुद्द मुख्यमंत्र्यांने करायला हवा होता. वास्तविक यामुळे पुन्हा एकदा विस्थापित शेतकर्‍यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नुकतेच समृध्दी महामार्गात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जात आहेत, त्या शेतकर्‍यांचे पुढील भवितव्य काय? धुळयातील शेतकरी धर्मा पाटील यांची 5 एकर शेती औष्णिक विद्युत केंद्रासाठी संपादित केली होती. 5 एकर शेती गेल्यानंतरही केवळ सरकारी यंत्रणेकडून केवळ 4 लाख रूपये देण्यात आले. तर धर्मा पाटील यांच्या शेजारी 74 गुंठे जमीन असलेल्या शेतकर्‍याने एजंट मध्यस्थी करून पावणे दोन कोटी रूपये भरपाई घेतली. 74 गुंठयासाठी पावणे दोन कोटी, तर पाच एकर म्हणजेच 200 गुंठयासाठी केवळ 4 लाख रूपये देण्यात आले. याचाच अर्थ कर्म, धर्माने शेतकरी असलेल्या धर्मा पाटील यांची एकप्रकारेच चेष्टा चालवली होती. आपला मोबदला मिळावा यासाठी धर्मा पाटील आपल्या 85 व्या वर्षी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या कार्यालयाच्या खेटा मारत होते. तरीही जमिनीचा मोबदला मिळत नव्हता, त्यामुळे अनेक दिवसांपासून धर्मा पाटील मंत्र्यालयात खेटा मारत होते. शेवटी धर्मा पाटील उद्विग्न झाले आणि त्यांनी विषाचा प्याला तोंडाला लावला. शेतकर्‍यांने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संपूर्ण राज्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि चर्चा सुरू झाल्या, धर्मा पाटील यांनी आत्महत्या का केली. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांकडून धर्मा पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यात आली. मात्र औषधीला तब्बेत साथ देत नसल्यामुळे सात दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत सोमवारी मावळली. विरोधकांकडूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकरी या आत्महत्येला हत्या ठरवत आहे. कारण सरकारी अनास्था. मुख्यमंत्र्याचे शेतकर्‍यांप्रती असलेले उदासीन धोरण. प्रशासकीय यंत्रणा हाकणारा मुख्य जर खमक्या नसेल, तर संपूर्ण यंत्रणा पंगू बनते, त्याचा अनुभव सर्वसामान्य घेत आहे. ई-गव्हर्नस, डिजीटल क्रांतीसारखे फतवे आपण राबवत आहोत, मात्र राज्यातच नव्हे तर देशभरात असलेला शेतकरी आजतरी मुख्यप्रवाहात आहे का? याचे परीक्षण करण्याची गरज आहे. कारण शासकीय योजना शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण बनवत नाही, तर पंगूच बनवत आहे. शेतकर्‍यांची प्रमुख मागणी म्हणजे, शेतीमालाला हमीभाव हवा, मात्र तो मिळत नाही, म्हणून शेतकरी आज आत्महत्या करत आहे. शेतीसाठी लागणार्‍या सामुग्रीचे दराच्या किमती सातत्याने वाढत आहे, मात्र शेतकर्‍यांच्या उत्पादनांना भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आज नागवला जात आहे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येने आता तरी शासकीय यंत्रणा आणि मुख्यमंत्री खडबडून जागे होतील, आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा, अन्यथा पुन्हा दुसर्‍या धर्मा पाटील आत्महत्या होईल, आणि आपण नुसते बघतच राहू.