पिसाळलेल्या काळ्या कुत्र्याची दहशत ; प्रशासन सुस्त
मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरून जाणेही मुश्किल झाले आहे. कुत्री दुचाकी चालकांच्या मागे धावत असल्याने छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी चालणेही अवघड होऊन बसले आहे. छत्रपती शिवाजी चौक, जगदंबा मंदीर, धालवडी फाटा येथे मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक आहे.
कुळधरण-कर्जत तसेच श्रीगोंदा मार्गावरील प्रवाशांना मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. मच्छी विक्री केंद्र, हॉटेल, दारुअड्डे तसेच रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्यातील शिळे अन्न शोधत कुत्री रस्त्यावर आडवी तिडवी पळत असतात.
मोकाट श्वानांची संख्या वाढू नये म्हणून पशुसंवर्धन विभागाकडुन भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करुन यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन यंत्रणा सुस्त असुन या विषयाकडे डोळेझाक केली जात आहे. रात्रीच्या सुमारास कुत्र्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. विचित्र आणि कर्णकर्कश्श आवाजात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे, चवताळून चावे घेणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगुस हे प्रकार घडत आहेत. कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या आजाराचे गंभीर परिणाम असतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ते निष्पाप प्रवासी व ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत.
