Breaking News

रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची अपेक्षा : विखे

प्रवरानगर प्रतिनिधी - शासकीय प्रशिक्षण मंडळ मुंबई आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तांत्रिक महाविद्यालयाच्यावतीने आयोजित महाभारती मेळाव्यात ५० राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला. राज्यभरातील सुमारे दीड हजार पदवीप्राप्त तरुणांना मुलाखतीची संधी उपलब्ध करून दिली. यातील पाचशे विद्यार्थ्यांचा निवड यादीत समावेश झाला आहे. 


लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुलाखती साठी सहभागी झालेल्या कंपन्याना मुलाखती घेता याव्यात, यासाठी सर्व सोयींनी युक्त सुविधा निर्माण करून देण्यात आल्या होत्या. ऑनलाईन नोंदणी केलेल्या सुमारे १ हजार ३५० विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याच्या उदघानासाठी प्रशिक्षण मंडळाचे उपसंचालक सतीश शर्मा, जिल्हा औद्योगिक मंडळाचे अध्यक्ष मुकुंद देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, डॉ. प्रिया राव, तांत्रिक शिक्षणाधिकारी प्रा. शरद रोकडे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. मनोज परजने, प्रा. व्ही. आर राठी, प्रा. एस. आर. कानवडे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी प्रास्तविक केले.

यावेळी विखे म्हणाल्या कि, ग्रामीण भागातील मुलं-मुली शेती आणि व्यवसायाचे कामात मदत करून शिक्षण घेत असली तरी ते हुशार आहेत. मात्र खेड्यातील विद्यार्थ्यांना न्यूनगंडामुळे मुलाखतीला सामोरे जाताना प्रश्न निर्माण होतात. अ कडे मुलांच्या बरोबरीनेच मुली सुद्धा उच्च शिक्षण घेत आहेत. पण त्याचबरोबर विवाहाचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.