Breaking News

महाबळेश्‍वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश


सातारा ;- महाबळेश्‍वर तालुक्यात निसर्गाला गालबोट लावून धनदांडग्यांकडून अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे पर्यटनस्थळाला बाधा पोहोचत आहे. तसेच येथील निसर्ग सौंदर्य कालबाह्य होत आहे. त्यामुळे महाबळेश्‍वरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाका, असा आदेश पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी दिला. दरम्यान, सेना-भाजप सत्तेत आल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी महिलांची नेमणूक करण्यात येत असल्याचा जुना अनुभव आहे. त्याचीच पुनरावृत्ती सेना-भाजप सत्तेत आल्यानंतर झाली आहे. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशानुसार वंदना खुल्लर यांच्या कार्यकालात महाबळेश्‍वर शहर परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. आताही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या कार्यकालात पालकमंत्र्यांनी अतिक्रमणाबाबत डरकाळी फोडली आहे. त्यामुळे अनाधिकृत बांधकामासह शासकीय जागेत झालेल्या अतिक्रमणांवर लवकरच बुलडोजर फिरवला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 
महाबळेश्‍वर येथे आयोजित शेतकरी कर्जमाफी योजना व अनधिकृत बांधकामांविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार राजेश शेंडगे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शहरप्रमुख विजय नायडू, बांधकाम अभियंता महेंद्र पाटील, विद्युत मंडळ अभियंता चांदणे उपस्थित होते. महाबळेश्‍वर नगरपालिका व उपविभागीय अधिकारी वाई यांनी संयुक्त कारवाई करून अनधिकृत बांधकामावर कायद्याची जरब बसवावी. अनाधिकृत बांधकामे शोधून कोणाचाही मुलहिजा न ठेवता कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.