Breaking News

बनावट नोटांचा कारखाना उद्धवस्त; दोघांना अटक

सोलापूर, दि. 27, जानेवारी - तालुक्यातील टाकळी येथे 50 व 100 रुपयांच्या बनावट नोटा छापणा-या दोन संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून बनावट नोटासह नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक पोलीस कॉन्स्टेबल (जळगाव) आहे.

वशिष्ट कुंडलिक जाधव (वय- 42 रा.टाकळी (टे) ता. माढा) व रवीकांत वसंत पाटील (वय-49 रा.साईभक्ती रेसिडेन्सी, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना आज (शुक्रवार) रोजी दुपारी एक वाजता माढा येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिश ए.आर.सय्यद यांनी आदेश दिले आहेत.



विशेष म्हणजे अटक केलेल्या दोघापैकी रवीकांत पाटील हा पोलीस कॉन्स्टेबल आहे. तर वशिष्ट जाधव हा 14 वर्षे तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आलेला अट्टल गुन्हेगार आहे. आरोपींकडून 50 रुपयांच्या पासष्ट नोटा, दोन प्रिंटर, एक स्कॅनर, एक लॅपटॉप, पेनड्राईव्ह, नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.


भिगवण पोलिसांनी टेभुर्णी पोलिसांच्या मदतीने टाकळी (टे) येथील वशिष्ट जाधव यांच्या घरावर छापा मारला. वशिष्ट जाधव यास अटक करण्यासाठी पोलीस धावले असता त्यांच्यावर त्याने दगडफेक केली. यात श्रीरंग शिंदे, बापू हडगळे हे दोघे पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले.