Breaking News

दाभोलकरांचे फरार मारेकरी पकडायला स्पेशल टास्क फोर्स नेमावी.

नवी मुंबई, दि. 21, जानेवारी - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 जानेवारी 2018 रोजी 53 महिने तसेच कॉ. गोविंद पानसरे यांच्या खूनाला 35 महिने पूर्ण होत आहेत. खुनाच्या कटाचे सूत्रधार म्हणून आरोप पत्र दाखल झाल्याने सनातन व हिंदू जनजागरण समितीचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे तुरुंगात आहेत. दोनही खुनाच्या तपास यंत्रणांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे फरार संशयित मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात शासन दिरंगाई करीत आहे.



आता तर पानसरे , कलबुर्गी आणि गौरी लंकेश ह्यांच्या खुनाच्या मध्ये एकच पिस्तुल वापरल्याचे देखील पुढे येत आहे ह्या पार्श्‍वभूमीवर दाभोलकर पानसरे क लबुर्गी ह्यांचे फरार मारेकरी पकडण्या साठी महाराष्ट्र शासनाने स्पेशल टास्क फोर्स नेमावी अशी मागणी महाराष्ट्र अनिस तर्फे आज बेलापूर येथील पत्रकार परिषदे मध्ये करण्यात आली. ह्या वेळी पुढे असे सांगण्यात आले कि राज्य शासनाकडून दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलिस दलाचे हसे होत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही, असा संदेश जात आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ हे आंदोलन देशभर राबविले. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. तरीही शासनाची राजकीय इच्छाशक्ती जागृत झालेली नाही.