पं. आनंद भाटेंच्या भजन संध्येने संगमनेरकर मंत्रमुग्ध
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मालपाणी लॉन्स येथे या श्रवणीय भजन संध्येचे आयोजन केले होते. यावेळी माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, डॉ. हर्षल तांबे, लक्ष्मणराव कुटे, शरयु देशमुख, शोभा कडू, राजवर्धन थोरात, बाबा ओहोळ, नवनाथ अरगडे, रमेश गुंजाळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, श्रीराम कुर्हे, केशवराव मुर्तडक आदी उपस्थित होते.
भजनसंध्येची सुरुवात पं. आनंद भाटे यांनी संत तुकारामांच्या ‘‘ जय जय राम कृष्ण हरी ’’ या अजरामर भक्ती गिताने केले. पहिल्याच भक्ती गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली. सुंदर निवेदन, अप्रतिम बासरी वादन, तबला वादन व श्रवणीय संगीत साथ यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.
‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची’, ‘मोरया मोरया गणपती बप्पा मोरया’ या भजनांनी भक्तीरसाची उंची गाठली. ‘देव विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव पुजा तिर्थ, विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या गिताने पंडीत भिमसेन जोशी यांची आठवण करुन दिली. पं. आनंद भाटे यांनी सादर केलेले कट्यार काळजात घुसली चित्रपटातील ‘सूर निरागस हो गणपती, शुभनयना करुणामय हो’ या गितांनी सर्व उपस्थितांना ठेका धरायला लावला. तर ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी’ या गिताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सुमारे तीन तास चाललेल्या या भक्ती संगीताने संगमेनरकर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले.
यावेळी डॉ. प्रतापराव उबाळे, अनिल थोरात, किरण कानवडे, भास्कर पानसरे, बाळासाहेब उंबरकर, सचिन गुंजाळ आदींसह शहरातील व तालुक्यातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी बाबा ओहोळ यांनी आभार मानले.
