Breaking News

युवकाला जिवंत जाळल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा


ठाणे, दि. 04, जानेवारी - हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून युवकाला जिवंत जाळल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन्नी सोनावणे असे आरोपीचे नाव असून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. एम. पटवर्धन यांनी ही सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने तीन प्रत्यक्ष साक्षीदारांसह एकूण 11 जणांची साक्ष नोंदविली होती. दरम्यान, दंडाची रक्कम मयताच्या नातेवाईकाला देण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

रबाळे गावात 2013 रोजी एका हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून आरोपी सन्नी सोनावणे आणि मृत गणेश कोटल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर गणेश जेवत असतांना आरोपी सन्नी सोनावणे याने पेट्रोलने भरलेला कॅन गणेशच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिले. या घटनेत गणेश कोटल हा 95 टक्के भाजला गेल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.