Breaking News

इस्त्रोने गाठले उपग्रहांचे शतक

श्रीहरीकोटा/वृत्तसंस्था :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने शुक्रवारी अभूतपूर्व असा इतिहास नोंदवत, ‘इस्रो’चे पीएसएलव्ही सी- 40, रॉकेटमधून 31 उपग्रह अंतराळात झेपावले. यात तीन भारतीय तर 28 विदेशी उपग्रहांचा समावेश आहे. अवकाशात झेपावलेले ‘इस्रो’चे हे शंभरावे उपग्रह आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. 


शुक्रवार सकाळी 9.28 वाजता एकत्र 31 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यात कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया ब्रिटन आणि अमेरिका या देशांतील उपग्रहांचा समावेश आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागातून बनवलेला पहिला भारतीय उपग्रह आयआरएनएसएस- 1 एच हा प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न चार महिन्यांपूर्वी अयशस्वी ठरला होता. पीएसएलव्ही अग्निबाणाने आजवर 41 वेळा उपग्रहांसह अवकाशात भरारी घेतली होती.


भारताचा कार्टोसॅट-2 हा 100 वा उपग्रह अंतराळात स्थिरावला. याशिवाय आंतराष्ट्रीय अंतराळ व्यापारात मोठी झेप घेत इस्रोने इतर सहा देशांचे 28 उपग्रह अवकाशात सोडलेत. पीएसएलव्ही-सी 40 या रॉकेटचे हे 42 वे उड्डाण होते. विदेशी अंतराळ संस्थांनी भारतीय शास्त्रज्ञांवर दाखवलेला विश्‍वास त्यांनी यशस्वी करून दाखवला. भारताच्या शतकी उपग्रहामुळे, आता जगभरात भारताने आपला दबदबा निर्माण केला. त्यामुळे भारताला सुपरपॉवर बनण्यासाठी इस्रो सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.