Breaking News

राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार नगराध्यक्ष राऊत यांना प्रदान

कर्जत /प्रतिनिधि/- सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना देण्यात आला.


कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार या योजनेचा अत्यंत सकारात्मक व चांगला वापर करून दुष्काळी म्हणून प्रसिध्द असलेल्या कर्जत तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार या योजनेद्वारे कर्जत शहराला पाणीदार बनवले. मृद व जल संधारण मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहराभोवती असलेल्या सर्व नदी नाल्याची खोलीकरण, रुंदीकरण करून यावर्षी शहराला एकही टँकर लागणार नाही असे काम उभे केले. 

यामुळे शहरातील घराघरातील बोरवेललाही चांगल्या पद्धतीने पाणी वाढले. या सर्व कामामुळे शासनाने नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार जाहीर झाला होता. सदर पुरस्कार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राऊत यांना देण्यात आला.

या पुरस्काराचे वितरण मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मृद व जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त दीपक सिंघल, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांच्यासह तालुका कृषी अधिकारी राजेन्द्र सुपेकर, अमृत काळदाते, वैभव शहा, अनिल गjदादे, सतीश, समुद्र,कृषी सहाय्यक अधिकारी संतोष सुरवसे,नगर पंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.