देशाच्या एकात्मतेसाठी हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्याची गरज - हंसराज अहिर
देशाच्या एकता, एकात्मतेसाठी तसेच प्रशासन सुव्यवस्थित चालविण्यासाठी एकाच भाषेची गरज असते. म्हणूनच राजभाषा हिंदीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे,असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आज येथे म्हणाले.महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या 2016- 17 साठीच्या पुरस्कारांचे वितरण वांद्रे येथील रंगशारदा नाट्यमंदिरात झालेल्या समारंभात श्री. अहिर तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी आमदार ॲड. आशिष शेलार, अकादमीचे कार्याध्यक्ष नंदलाल पाठक, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसचिव संजय भोकरे, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक पुष्पा भारती, जेष्ठ अभिनेते राजेंद्र गुप्त, कवयित्री चित्रा देसाई, दूरचित्रवाणी कलाकार वरुण बडोला आदी उपस्थित होते.देशात प्रशासन चालविण्यासाठी एकाच भाषेची आवश्यकता असते असे सांगून श्री. अहिर पुढे म्हणाले, संरक्षण विभागातही आदेश देण्यासाठी हिंदीचाच उपयोग करावा लागतो. हिंदीबरोबरच आपण ज्या प्रदेशात राहतो येथील प्रादेशिक भाषेचाही सन्मान केला पाहिजे. हिंदीचा सर्वाधिक प्रचार-प्रसार साहित्याच्या माध्यमातून झाला आहे. त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रही हिंदीच्या प्रसारास महत्त्वपूर्ण ठरले आहे. हिंदी देशाची राजभाषा आहे तिला राष्ट्रभाषा बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.