दखल - वढूच्या ग्रामस्थांचा आदर्श !
पुणे जिल्ह्यातील वढू बुदु्रक या गावाची ओळख इतिहासामुळं आहे. संभाजी महाराजांची तिथं समाधी आहे. श्रीगोंदे तालुक्यातील बहाद्दुरगड इथं संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचा मृतदेह वढूपर्यंत आणला होता. वढू इथं संभाजी महाराजांचा मृतदेह शिवून तिथं अंत्यसंस्कार करण्यात आले. या स्थळापासून कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभ आहे.
ब्रिटिश सैन्यांच्या महार रेजिमेंटनं दुसर्या बाजीरावाच्या बलाढ्य सैन्याचा कोरेगाव भीमा इथं पराभव करून पेशवाई संपविली. या युद्धाला दोनशे वर्षे पूर्ण झाली. कोरेगाव भीमा व वढू या दोन गावांची अशी ऐतिहासिक ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड तळ्याच्या सत्याग्रहाच्या वर्षात विजयस्तंभाला भेट दिली. तेव्हापासून राज्यातील दलित समाज मोठ्या संख्येनं कोरेगाव भीमा इथं येतो. दलित व मराठा समाज पेशवार्ईच्या बाबतची भूमिका एकच आहे.
पेशवाईची सत्ता संपूर्ण देशभर होती; परंतु त्यांच्या स्पृश्य, अस्पृश्यतेमुळं या दोन समाजात त्यांच्याविषयी नाराजी आहे. अजूनही बर्याचदा अशी नाराजी उफाळून येत असते. ब्राम्हण्यवादाविरोधात बहुजन समाज एकवटत असतो. त्यात मराठा व दलित बर्याचदा एकत्रच असतो. कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी दोन शतकाहून अधिक काळ येत असलेल्या दलित समाजासाठी वेगवेगळ्या सुविधा पुरविण्याचं काम मराठा समाज करीत असतो. त्यांच्यात कधीही या वर्षी एक जानेवारीला झाली, तशी जातीय दंगल किं वा साधा वाद झाला नाही.
पेशवाईची सत्ता संपूर्ण देशभर होती; परंतु त्यांच्या स्पृश्य, अस्पृश्यतेमुळं या दोन समाजात त्यांच्याविषयी नाराजी आहे. अजूनही बर्याचदा अशी नाराजी उफाळून येत असते. ब्राम्हण्यवादाविरोधात बहुजन समाज एकवटत असतो. त्यात मराठा व दलित बर्याचदा एकत्रच असतो. कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी दोन शतकाहून अधिक काळ येत असलेल्या दलित समाजासाठी वेगवेगळ्या सुविधा पुरविण्याचं काम मराठा समाज करीत असतो. त्यांच्यात कधीही या वर्षी एक जानेवारीला झाली, तशी जातीय दंगल किं वा साधा वाद झाला नाही.
बाहेरच्यांनी येऊन चिथावणी दिल्यानं जातीय तेढ निर्माण झाली. त्यात कोरेगाव भीमापासून सणसवाडी, शिक्रापूरपर्यंत दंगलीचं लोण पसरलं. कोण कोणत्या जातीचा आहे, हे पाहून नुकसान होत नसतं. सर्वांनाच त्याची झळ सोसावी लागते. पुणे-नगर रस्ता अतिशय रहदारीचा. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठा व्यवसाय उभा
राहिलेला. दंगलीची झळ या व्यावसायिकांना ग्रामस्थांना बसली. जाळपोळ झाल्यानं अनेक कुटुंबांवर बेघर व्हायची वेळ आली. गावाची आणि दोन समाजाची बदनामी झाली, ती वेगळीच.
या पार्श्वभूमीवर वढू बुद्रुक (ता. शिरूर) गावातील परस्परविरोधी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा समजूतदारपणा दाखवला. यापुढं संभाजी महाराज समाधी कार्यक्रमांमध्ये गावाबाहेरच्या संस्था- संघटनांना हस्तक्षेप करू देणार नाही, असा महत्त्त्वपूर्ण निर्णय ग्रामस्थांनी घेतला. जातीय दंगलींचा फायदा ठरावीक राजकीय पक्ष मतांच्या धु्रवीकरणासाठी घेत असतात. गेल्या पाच वर्षांपूर्वी देशभरात मुझफ्फरनगरची दंगल गाजली. तिचा वापर मतांच्या धु्रवीकरणासाठी करून भाजपनं देशाची व उत्तर प्रदेशाची सत्ता मिळविली.
साठ लोकांचा बळी गेला. पन्नास हजार लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. कित्येक महिलांची इज्जत लुटली गेली. मुझफ्फरनगर दंगल दोन महिने भडकत होती. जगभर या शहराची बदनामी झाली. दोन समाज कायम संशयाच्या भावनेतून पाहायला लागले. आता तेथील हिंदू व मुस्लीमांनी आपल्यातील गैरसमजाचा राजकीय फायदा कुणालाही होऊ द्यायचा नाही, असं ठरविलं आहे.
त्यांचं होतं राजकारण आणि समाजमन कायमच दुभंगतं. आता दंगलीचे व अन्य गुन्हे दोन्ही समाजांनी सामंजस्यानं मागं घेण्याचा निर्णय घेतला. अगदी तसाच निर्णय वढू ग्रामस्थांनी घेतला आहे. अॅट्रासिटीसह अन्य गुन्हे दोन्ही समाजांनी सामंजस्यानं मागं घेण्याचा निर्णय घेतल्यानं समाज मनाच्या जखमांवर लवकर खपल्या धरल्या जातील. समाधीच्या वादातून परस्परविरोधात दाखल केलेले गुन्हे मागं घेण्यात येतील, असा निर्णय सवार्नुमते घेण्यात आला.
कोरेगाव भीमाच्या गावकर्यांनीदेखील सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वढूत संभाजी महाराज व गणपत गायकवाड यांची समाधी आहे. समाधीच्या मुद्द्यावरून 29 डिसेंबरला इथं वाद झाला होता. त्याचे पडसाद 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील स्मृतिस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमावर उमटले होते. या वादातून हिंसाचार व जातीय द्वेष भडकला. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही गटातील लोकांनी एकत्र येत चर्चा केली.
हिंदुत्ववादी संघटना व दलित संघटनेचे गावाबाहेरील लोक गावात येऊन समाधीवरून वाद निर्माण करत असल्याची गावकर्यांची भावना आहे. त्यामुळं अशा लोकांचा यापुढं गावातील सार्वजनिक कार्यक्रमात हस्तक्षेप सहन न करण्याचा इशारा देण्यात आला. 29 डिसेंबर रोजी समाधीजवळील फलक काढून टाकल्यामुळं दोन गटांत वाद उफाळला होता. यातून 51 जणांविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला.
वास्तविक गावकर्यांनी त्याच रात्री अॅट्रासिटी न लावण्याची भूमिका घेतली होती. दोन्ही समाजांनी परस्पर विरोधातील गुन्हे मागं घेण्याची तयारी दाखवली होती; मात्र बाहेरच्या संघटनांनी हस्तक्षेप करत अॅट्रासिटी कायम ठेवण्याचा आग्रह धरला. यातून वाद उद्भवला. मात्र आता दोन्ही गटांना चूक उमगली आहे. त्यांनी गुन्हे मागं घेण्याचाही निर्णय घेतला. तसेच छत्रपती संभाजी राजांची जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रमही ग्रामस्थ व ग्रामपंचायत स्वतःच करेल, असा निर्णय घेतला.
वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या गोविंद गायकवाड यांच्या समाधीसंदर्भातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय वढू ग्रामस्थांनी घेतला. यासंदर्भातील इतिहासकालीन संदर्भांची शहनिशा करून त्यानंतर समाधीजवळ फलक लावू, याला दोन्ही समाजांनी मान्यता दिली. तोपर्यंत समाधिस्थळ पूर्ववत करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा व दलित समाजांतील दरी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.
गुजरातमधील दलित समाजाचा युवा नेता, आमदार जिग्नेष मेवाणी, उमर खलीद यांच्यासह अन्य नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले, तरी आणि शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांचा संबंध असल्याचा सरकारी अहवाल असला, तरी हा मुद्दा अॅड. आंबेडकर यांनी खोडून काढला आहे.
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उशिरा का होईना मेवाणी यांच्यावर गुन्हा दाखल करणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. सरकारला सद्बुद्धी सुचली, तर मराठा व दलित समाजातील सामंजस्य टिकेल. खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीप्रमाणं वादग्रस्त भूमिका घेतली असली, तरी सक ल मराठा समाज तसंच संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं दोन्ही समाजांतला तणाव कमी होण्यास मदत होईल. कोपर्डी, खर्डा येथील घटनानंतर दोन्ही समाजांत सातत्यानं तणाव वाढत होता. वढू व कोरेगाव भीमाचा आदर्श समोर ठेवला, तर अस्मितांचा वणवा पेटणार नाही.
