Breaking News

रत्नागिरी न्यायालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उद्यापासून

रत्नागिरी,- रत्नागिरी न्यायालयाला यंदा 150 वर्षे पूर्ण होत असल्याने शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील न्यायाधीश, न्यायिक कर्मचारी, वकील यांच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारीला दोन्ही जिल्ह्यांतील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये न्यायाधीश, वकील, कर्मचारी व पक्षकारांच्या उपस्थितीत 150 व्या वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. ही माहिती रत्नागिरी जिल्हा बार असोएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्ताने इतिहासाचे पुनरावलोकन करून भावी पिढीसाठी तंत्रज्ञानातील कायदेशीर शिक्षण, प्रशिक्षण या विषयांची माहिती देणारा उपक्रम राबविण्यात येणार आहे. न्यायालयाला असलेली ऐतिहासिक परंपरा विचारात घेता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग न्यायालयांमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या एक वर्षाच्या क ालावधीत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या वर्षभरात कमी करण्यासाठी परिणामकारक उपक्रम राबविणे, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, पथनाट्य यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. 

दोन्ही जिल्हा न्यायालयांची ऐतिहासिक वैशिष्ट्ये, छायाचित्रे व अन्य कागदपत्रांचे संवर्धन करून प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत दोन्ही जिल्ह्यांचा एकत्रित समारंभ रत्नागिरीत करण्यात येणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत रत्नागिरीत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व उपक्रमांना नागरिक व पक्षकारांनी योगदान व सहभाग द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.