Breaking News

गोदाकाठ महोत्सवातून महिलांना आर्थिक स्थैर्य : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी - महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. सर्वच क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत, हे महिलांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात दाखविलेल्या आत्मविश्वासाला पाठबळ मिळावे. बचतगटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळून आर्थिक स्थैर्य गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे, असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा काळे यांनी केले. 
गोदाकाठ महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रियदर्शनी महिला मंडळाच्यावतीने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे हा महोत्सव पार पडला. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, स्टार प्रवाह फेम ‘लक्ष्य’ मालिकेतील सिनेअभिनेत्री धनश्री क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यावेळी उपस्थित होते. पुष्पा काळे म्हणाल्या, महिलांना सहजासहजी रोजगार उपलब्ध होत नाही. व्यवस्थापनाच्या बाबतीत महिला अतिशय हुशार असतात. महिलांना घरगुती छोट्या-मोठ्या व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाल्यास या महिला चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात. या व्यवसायातून त्यांच्या संसाराला नक्कीच हातभार लागू शकतो. त्यामुळे गावागावात महिलांचे बचतगट स्थापन करून महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी फूड फेस्टिवल सुरु केले. या फूड फेस्टिवलला महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळत गेला. याची व्याप्ती वाढत गेली. गोदावरी नदीच्या काठी हा महोत्सव भरत असल्याने या फूड फेस्टिवल महोत्सवाला ‘गोदाकाठ महोत्सव’ असे नाव देण्यात आले. मागील काही वर्षांपासून हा महोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध झाला आहे. लाखो रुपायांच्या उलाढालीतून यशस्वी महिला उद्योजक घडविण्याचे काम हा महोत्सव करीत आहे.