Breaking News

चिमुकलीवर अत्याचार करणार्‍याला दहा वर्षे सक्तमजुरी


पुणे, दि. 27, जानेवारी - चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. दत्तात्रय ऊर्फ दत्ता राजेंद्र मोरे (वय 19, रा. सदाशिव पेठ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दत्तवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 10 मार्च 2013 रोजी दुपारी घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी 4 साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलीची आणि ससूनमधील वैद्यकीय अधिकार्‍याची साक्ष महत्त्वाची ठरली. ती मुलगी मोरे याला भावड्या म्हणून ओळखत होती. तिने त्याला न्यायालयातही ओळखले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केला. त्यांना हवलदार संजय मेरूकर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.
मोरे आणि पीडित मुलगी एका इमारतीत राहत आहेत. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी इतर मुलांसोबत जिन्यावर खेळत होती. त्यावेळी मोरे तिथे गेला. तो तिला दुसर्‍या मजल्याच्या जिन्याच्या पायरीवर घेऊन गेला. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी पीडित मुलगी रडत घरी गेली. घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. त्यामुळे तिच्या आईने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने मोरे याला शिक्षा सुनावली.