Breaking News

… तर ऊसाला एफ. आर. पी. देणेसुध्दा अवघड : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी :- या गळीत हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे भाव ३ हजार ५०० रुपये होते. त्यात ७०० ते ८०० रुपयेप्रमाणे प्रती क्विंटल घसरण झाली. त्यामुळे सध्या साखरेचे भाव २ हजार ८०० रुपये पर्यंत खाली आले. त्यामुळे चालू हंगामात कारखाना चालविणे आर्थिकदृष्ट्या मोठे आव्हान आहे. कारखान्याने २ हजार ३०० रुपये उचल दिली. सद्यस्थितीत २ हजार ५५० रुपये उचलच काय, अगदी २ हजार १०० रुपये एफ. आर. पी. देणेसुध्दा अवघड आहे, असे मत सहकारातील जाणकार नेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. 
अकोले तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी संगमनेर कारखान्याने २ हजार ५५० रुपये प्रतीटनास उचल द्यावी, यासाठी कारखान्याविरुध्द आंदोलन करण्याचा इशार्‍यासंदर्भात आ. थोरात यांना विचारले. त्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, काही मंडळी फक्त राजकीय हेतू ठेऊन चांगला चाललेला सहकार अडचणीत आणण्यासाठी काम करत आहेत. संगमनेर कारखान्याने आतापर्यंत अनेकवेळा महाराष्ट्रात नंबर एकचा व जवळपासच्या कारखान्यांपेक्षा सतत ३०० ते ४०० रुपये प्रती टन ऊस भाव जास्त दिलेला आहे. या कारखान्याने सतत ऊस उत्पादकांच्या हिताचाच विचार केलेला आहे. त्यामुळे कारखान्याच्या इतिहासात कधीही ऊस भाव जास्त मिळावा, यासाठी ऊस उत्पादकांचे आंदोलन झालेले नाही. संगमनेर कारखान्याच्या ऊस भावाबाबत कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरसुध्दा एक मोठा विश्‍वास आहे. त्यामुळे ऊस उत्पादक कधीही ऊसभावाबद्दल विचारत नाहीत. कारखान्याचे व्यवस्थापन अतिशय पारदर्शी, काटकसर व शिस्तीचे असल्यामुळे गाळप हंगाम संपल्यानंतर रंगराजन समितीच्या ऊस नियंत्रण मंडळाचे ७० : ३० च्या सुत्रानुसार अधिक ऊस भाव मिळण्याची खात्री ऊस उत्पादकांना आहे. मात्र यांना शेतकरी व ऊस उत्पादकांशी काहीही घेणे देणे नाही, अशी मंडळी राजकीय भावनेतून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला शेतकरी व ऊस उत्पादकांनी थारा दिला नाही. कारण त्यांचा मोठा विश्‍वास कारखान्यावर आहे.