Breaking News

बहुजननामा - 96 कुळी शूद्रादिअतिशूद्र हेच खरे मराठा!


बहुजनांनो.... ! 
बहुजननामाचे काही नियमित वाचक माझ्याशी फोनवरून चर्चा करीत असतात. मी ‘96 कुळी मराठा’ ही संकल्पना शूद्रादिअतिशूद्रांसाठी वापरतो, या बद्दल काहींना आश्‍चर्य वाटले. मी ते वारंवार स्पष्ट करीत असतो. पुर्वी गणराज्ये होती. ही गणराज्ये अनेक कुळांची मिळून बनलेली होती. केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र मोठमोठ्या नद्यांच्या काठी सिंधू संस्कृती सारख्या संस्कृती वसल्यात. भारतात प्रत्येक भूभागातून मोठ्या नद्या वाहतात. त्यांच्या खोर्याांमध्ये प्रादेशिक संस्कृती वसल्यात. त्यापैकी एक 96 कुळी मराठा संस्कृती. या प्राचिन संस्कृत्या किती विकसित व प्रगतीशिल होत्या याची कल्पना आपण सिंधू खोर्या.तील उत्खननावरून करू शकतो. महाराष्ट्रात तुळजापूरच्या भवानी पासून कानबाई, शूर्पणखां व याहा-मोगीपर्यंतच्या गणराण्यांचा इतिहास सापडतो. कुलधर्मी मातृवंशसत्ताक बळीराजा, म्हैसासूर, नरकासूर असे कितीतरी क्रांतिकारी व समतावादी राजे होऊन गेल्याचा इतिहास जीवंत आहे. दरम्यानच्या आर्य आक्रमणांमुळे व त्यांच्या वर्ण-जातीव्यवस्थामुळे या क्रातीकारी संस्कृतींचा इतिहास दडपला गेला, विकृत करण्यात आला. त्याचे एक उदाहरण दिले म्हणजे स्पष्टता येईल.

‘मराठा’ ही संकल्पना महाराष्ट्रात राहणारा तो मराठा या अर्थाने बरेच वर्षे वापरात होती. तत्पुर्वी ती कुलसंस्कृतीशी निगडित संकल्पना होती. शुद्र शिवरायांमुळे ही संकल्पना भारतभर प्रतिष्ठीत झाली. शिवाजी महाराजांसाठी व त्यांच्या शूद्र लढवैय्या मावळ्यांसाठी ही ओळख गर्वाची होती. या मावळ्यांमध्ये ही सर्व 96 कुळं पसरली होती. नाभिक समाजाचे जीवाजी व शिवाजी नावाचे लढवैय्ये ‘महाले’ व ‘काशिद’ कुळाचे होते, रामेशी जातीचे बहिर्जी ‘नाईक’ होते, धनगर समाजाचे ‘शेलार’ कुळाचे मामा होते. अशी सर्व 96 कुळं सामावून घेणारे मावळे केवळ आपल्या कुलमाता व गणराणी आई भावनीच्या प्रेरणेने लढत होती. या प्रेरणेतूनच त्यांनी माता भवानीचे ‘मराठा गण-स्वराज्य’ निर्माण केले. ते खरे 96 कुळी मराठे होत. ती त्यांची अस्सल सांस्कृतिक कमाई होय! 

शूद्रादिअतिशूद्रांनी स्वकष्टाने लढाया जिंकून व जीव धोक्यात घालून एखादी ‘कमाई’ केली की ती उच्चजातीयांनी लुटायची, हा मनुधर्म भारतभर सत्ता गाजवीत होता व आहे. केवळ आर्थिक कमाईच लुटली जाते असे नाही तर, सांस्कृतिक कमाईसुद्धा लुटली जाते. मराठा ही भारतभर प्रतिष्ठीत झालेली सन्माननीय उपाधि शूद्रादिअतिशूद्र असलेल्या 96 कुळी मावळ्यांनी कमावलेली होती. ही सांस्कृतिक कमाई ब्राह्मणांना चोरता येत नव्हती कारण त्यात कुळधर्माचा अडथळा होता. मात्र तत्कालीन वतनदार-जमिनदार जे स्वराज्याचे शत्रू होते, त्यांना ही चोरी सहज शक्य होती व फायद्याचीही होती. कारण शूद्र कुळातूनच हे वतनदार-जमिनदार बनलेले होते. ज्यांनी प्रस्थापित परकिय राजवटींशी तोडी-पाणी करून स्वकियांशी गद्दारी केली असेच लोक वतने मिळवित व जमिनदार-उमराव बनत. याला एखाद-दुसरा अपवाद असू शकतो. शिवरायांनी त्यांचा फार सखोल अभ्यास केल्यामुळे त्यांनी अशा गद्दार वतनदारांना ‘स्वराज्या’पासून चार हात लांबच ठेवले. शिवरायांचा विश्‍वास फक्त 96 कुळी शूद्रादिअतिशूद्रांवरच होता. कारण तत्कालीन वतनदार-जमिनदार हे परकीय आक्रमकांना नेहमीच फितूर होत होते. आज भिडे-एकबोटेंसारख्या शत्रूंना फितूर झालेले वतनदार आपण पाहतोच आहोत. काही अ-जाणते राजे उघड फितूर होतात, तर काही ‘जाणते-राजे’ लपून फितूर होतात. आर्य आक्रमकांनी इतिहास-पुरांणांच्या पानावर राम-कृष्ण सारख्यांना ‘क्षत्रिय’ म्हणून फितूर करून घेतले. तेथून या तथाकथित क्षत्रियांचा तो धर्मच बनला, नव्हे रक्तातच भिनला. आर्य, मुसलमान, ख्रिश्‍चन, शक, हून, पोर्तुगिज वगैरे अशा कीतीतरी परकियांना देश विकून टाकणारे हे क्षत्रिय म्हणजे देशाला कलंकच म्हटले पाहिजेत.

शिवरायांना आयुष्यभर ‘शूद्र’ म्हणवून घेण्यातच रस होता. मात्र ब्राह्मण व क्षत्रियांनी त्यांना राजा मानण्यास नकार दिल्याने समतावादी स्वराज्याची निर्मिती अडचणीत येत होती. त्यामुळे केवळ नाईलाजास्तव शिवाजी राजेंना राजाभिषेक करून घ्यावा लागला. तरीही हेतू सफल झाला नाही. म्हणून मग त्यांनी खर्याषखुर्याव समतावादी शाक्त धर्मानूसार दुसरा राजाभिषेक करवून घेतला. तो सफल होत आहे, असे दिसताच ब्राह्मणांनी शिवराजेंना विष पाजून मारले. संभाजी युवराजांचाही असाच करूण अंत येथील ब्राह्मण-क्षत्रियांनी परकीय मुसलमान राज्यांशी युती करून घडवून आणला. मराठा या शब्दातून शिवाजी राज्याचा एक सन्मानयुक्त दरारा देशभर प्रतिबिंबित होत होता. स्वार्थासाठी तत्कालीन जमिनदार-वतनदारांनी स्वतःला ‘मराठा’ म्हणवून घ्यायला सुरूवात केली. स्वतःचे अस्तित्व वेगळे दाखविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नावापुढे 96 कुळी अशी उपाधि लावायला सुरू केले. खरीखुरी 96 कुळी असलेली शूद्रादिशूद्र मराठा प्रजा पुन्हा उपाधिहीन झाली. पुढे मराठा शब्द जाणिवपूर्वक जातीवाचक बनविण्यात आला. अशाप्रकारे शूद्रादिअतिशूद्रांनी कष्टाने कमाविलेली सांस्कृतिक ‘कमाई’ डल्ला मारून चोरून नेण्यात आली. कोणतेही कष्ट न करता मिळविलेल्या धनाची किंमत चोरांना नसते. 

ते धन उधळण्यातच त्यांना मजा वाटते. मराठा नावाचे सांस्कृतिक धन जातीच्या नावाने उधळण्यात आले. एवढे करून ते थांबले नाहीत. मराठा नावाच्या सांस्कृतिक संपत्तीचे मूळ मालक असलेल्या शूद्रादिअतिशूद्रांना हिन वागणूक देण्यासाठी ‘मराठा’ शब्दच वापरण्यात आला व आजही तो वापरण्यात येत आहे. मोर्चे-प्रतिमोर्च्यात हाच मराठा शब्द उधळण्यात आला. हे 96 कुळी नंतर इतके जात-आंधळे झालेत की, त्यांनी आपसातच 92 कुळी, 90 कुळी वगैरे पोटप्रकार पाडून एकमेकांचा द्वेष सुरू केला. रोटी-बेटी व्यवहार या अशा आकडेमोडवर आधारित व्हायला लागलेत. रंग, वर्ण, जात अशा वगवेगळ्या कृत्रिम संज्ञा वापरून काही लोक लुटारू बनतात व स्वतःला उच्चवर्गीय-उच्चजातीय समजतात. जगभर हा प्रकार सुरू आहे. उद्या जर अमेरिकेतील ‘काळे’ सर्वसत्ताधारी झालेत तर, अमेरिकेतील ‘गोरे’ रोज अंगाला काळे फासून बाहेर वावरतांना दिसतील. त्याचप्रमाणे उद्या जर भारतात ‘अस्पृश्य लोक’ सर्वंकष-सत्ताधारी झालेत तर ‘ब्राह्ण-क्षत्रिय’ म्हणविणारे लोक रोज तोंडाला ‘गाडगे-मडके’ बांधूनच घराबाहेर निघतील.
जयजोती! जयभीम!!
प्रा. श्रावण देवरे
Mobile - 88 301 27 270 
Email- s.deore2012@gmail.com