Breaking News

राज्यात पेट्रोलचे दर 80 पार

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असून, त्याचा फटका महाराष्ट्रात मोठया प्रमाणात बसत आहे. राज्यात आतापर्यत सर्वाधिक दर मुंबईमध्ये असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 80.10 रुपये प्रती लिटर आहेत. पेट्रोल 80 रुपयांच्या वर जाण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ असून या वर्षातली ही सर्वात मोठी वाढ आहे. मुंबईत पेट्रोल 80 रुपये 10 पैसे प्रती लिटर, तर डिझेल 67 रुपये 10 पैसे प्रती लिटर आहे. मात्र गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर लिटरमागे 80 रुपयांच्या पुढे गेला. नागपूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये पेट्रोल 80 च्या पुढे गेले, तर डिझेलचे दर 66 रुपयांवर गेले आहेत. जानेवारी महिन्यात पेट्रोलच्या दरात एकूण 2 रुपयांनी वाढ झाली. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत, तर दुसरीकडे, वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकार इंधनावरचे कर कमी करत नाही आहे. पण या कात्रीत सापडलाय तो सामान्य माणूस. खासकरून डिझेलचे दर वाढत राहिले, तर इतर सर्वच गोष्टींच्या किमती वाढणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑगस्ट 2014 नंतर प्रथमच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा परिणाम निश्‍चितच महागाई वाढण्यासाठी होत असल्यामुळे सर्वसामान्यांना पुढील काही दिवसांत महागाईचा फटका बसू शकतो. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही प्रचंड दरवाढ झालेली दिसून येते आहे. या दरवाढीमुळे सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार हे अटळ आहे.