Breaking News

निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र - व्यंकय्या नायडू


मुंबई : निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र बनू शकते हे लक्षात घेतले तर मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. “द योगा इन्स्टिट्युट”, मुंबई या संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभात ते बोलत होते. 
काम, ज्ञान आणि समर्पण या तीन गोष्टींचा समन्वय झाला तर हाती घेतलेले काम अधिक उत्कृष्टपणे पूर्णत्वाला जाऊ शकते. योग संस्थेने या तीन गोष्टींचा आपल्या कार्यात अंतर्भाव केल्याने ही संस्था केवळ एक संस्था न राहाता ती एक जीवनशाळा झाली आहे. संस्थेने भारतीय प्राचीन विज्ञानाचा भाग असणारे योग शिक्षण घराघरात पोहोचवले आहे, असे गौरोवोद्गार नायडू यांनी यावेळी काढले. ते पुढे म्हणाले की, संस्थेचे योग प्रशिक्षण आणि प्रचाराचे कार्य अलौकीक आहे. जागतिकस्तरावर काम करणारी ही एक महत्वपूर्ण संस्था असल्याचेही ते म्हणाले.

योग हा जीवनाचा समग्र दृष्टीकोन असल्याचे सांगून नायडू पुढे म्हणाले की, योग शिक्षण केवळ शरीर निरोगी ठेवते असे नाही तर मनाला निरोगी ठेवण्याचे काम ही नियमित योगातूनच होते. शारीरिक, अध्यात्मिक आणि भावनिक संतुलनाबरोबर कृतिशील समाज निर्मितीमध्ये योग महत्वाचा ठरतो. कामामधील एकाग्रता वाढवण्यास योग उपयुक्त ठरतो. बदलल्या जीवनशैलीमुळे हालचालींवर मर्यादा आली आहे, वाढत्या स्पर्धेमुळे भावनिक असंतुलन निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शांत आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग योगाच्या माध्यमातूनच मिळू शकतो.