Breaking News

इतरांच्या कामाचे श्रेय घेण्यातच विरोधक मग्न : तनपुरे


राहुरी प्रतिनिधी - विद्यमान सरकार आपल्या विचाराचे नसले तरी कागदोपत्री पाठपुरावा करुन अधिकाऱ्यांकडून कामे मार्गी लावतो. तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र केवळ प्रसिध्दीला हपापलेले आहेत. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात ते धन्यता मानत आहेत, असा आरोप लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला. राहुरी शहरातील करपे इस्टेट येथील ९ लाख रुपये खर्चाच्या भूमिगत गटारीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. 
नगर-राहुरी मतदारसंघाचे आ. शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख न करता नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले, की विद्यमान लोकप्रतिनिधी मंत्र्यांना भेटून फोटो काढून काढुन प्रसिध्दी करून घेत आहेत. राहुरी ग्रामिण रुग्णालयाची अत्यंत बिकट अवस्था झालेली होती. याठिकाणी अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आम्ही राहुरी ग्रामीण रुग्णालयासमोर उपोषण करत आंदोलन छेडले होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आरोग्यमंत्र्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. त्यावर सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कागदोपत्री पाठपुरावा केल्याने ग्रामीण रुग्णालयासाठी १७ कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र लोकप्रतिनिधी सद्यस्थितीत असलेले ग्रामीण रुग्णालय राहुरी शहराच्या बाहेर नेण्याच्या तयारीत आहेत. 

आ. कर्डिलेंनी रुग्णालय धर्माडी विश्रामगृहाच्या बाजूस डिग्रस शिवारात नेण्याचा खटाटोप सुरु केला आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाची त्याच जागेवर उभारणी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय शहरातील आहे, त्याच जागेवर होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राहुरी पालिकेने गोर गरिब जनतेच्या सेवेसाठी गामीण रुग्णालयाची जागा शासनाला बक्षिसपत्र करुन दिली. यामधून रुग्णसेवा घडली तसेच सध्याही नव्याने रुग्णालयाची निर्मिती होईपर्यंत पालिकेने रुग्णालयास तात्काळ अभ्यसिकेची जागा उपलब्ध करुन दिली. तसेच इतरही सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे यांनी सांगितले. 

पुढे ते म्हणाले, की नगरपालिकेत वर्षभरात काम करतांना फार अडचणीचा सामना करावा लागला मात्र त्या अडचणीवर मात करत शहरातील अनेक विकास कामे हाती घेतली तसेच काही कामांचे शासनस्तरावर पाठपुरावे केली जात आहे.

तसेच शहरात रस्ते गटारी तसेच विविध कामे चांगल्या प्रतिची व्हावीत व ठेकेदेरांनेही ही कामे उच्च दर्जाचे साहित्य वापरुन करण्याचा सल्ला यावेळी नगराध्यक्षांनी ठेकेदेरास दिला. या उदघाटन प्रसंगी प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, जेष्ठ नागरीक श्रीरंग म्हसे, नगरसेवक सुर्यकांत भुजाडी, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, नगरसेवक अक्षय तनपुरे,नगरसेविका मुक्ता करपे, भागवत गाडे, अशोक उर्हे,विनोद सबलोक, विजय करपे, गोरख दुसिंग, अरविंद आहेर, विजय करपे, सुजय भांड आदी उपस्थित होते.